Header Ads

सातारा शहरातील नागरिकांसाठी तातडीने आयसोलेशन सेंटर सुरू करा; आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी satara


सातारा
: सातारा शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. असंख्य रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. अशा रुग्णांमुळे त्या कुटुंबातील इतर व्यक्ती बाधित होण्याचा जास्त धोका आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सातारा शहरात आयसोलेशन सेंटर सुरु करणे आवश्यक आहे. याबाबत सातारा नगर पालिकेकडून दुर्लक्ष होत असून धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी आयसोलेशन सेंटर सुरु करण्याबाबत पालिका प्रशासनाला निर्देश द्यावेत अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. 

आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. साताऱ्यात कोरोना बाधितांची संख्या खूप वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असंख्य रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. घरातच उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांमुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याचा जास्त संभव आहे. घर अथवा फ्लॅट लहान असेल तर त्या होम आयसोलेशनला अर्थच उरत नाही. होम आयसोलेशनमधील रुग्णामुळे घरातील एखाद्या व्यक्तीला बाधा झाली असेल आणि ती व्यक्ती बाहेर, बाजारात अथवा इतरत्र फिरत असेल तर बाधितांची संख्या वाढू शकते हे नाकारता येत नाही. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरणाची सोय असणे अत्यावश्यक आहे. 

सातारा हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून जिल्ह्यातील मोठी नगर पालिका म्हणून सातारा पालिका ओळखली जाते. जिल्ह्यातील छोट्या नगर पालिकांनी नागरिकांसाठी स्वतंत्र विलगीकरण केंद्र सुरु केली आहेत पण, सातारा पालिकेकडून मात्र अद्यापही कोणतीही सुविधा दिली गेली नाही. विलगीकरणातील रुग्णाला भोजन, स्वछता, लागणारी औषधे आणि डॉक्टरच्या देखरेखीची आवश्यकता असते. पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात शाळा आहेत. अनेक संस्थांची विद्यालये, महाविद्यालये, मंगल कार्यालये आहेत. सातारा शहरातील विविध भागांसह शाहूपुरी, शाहूनगर याठिकाणी सातारा पालिकेमार्फत आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात यावीत. यासाठी पालिकेकडे १४ व्या वित्त आयोगातील निधी असून तो कोरोना महामारीसाठी खर्च करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे ज्या रुग्णांचा स्कोर पाच पेक्षा कमी आहे अशा रुग्णांच्या विलगीकरणासाठी पालिकेमार्फत तातडीने आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात यावीत, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पहिल्या लाटे एवढे होत नाही. ग्रामीण भागासह सर्वत्रच रॅट टेस्ट किट उपलब्ध करून द्यावीत. रुग्ण सापडला की, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंगचे प्रमाण मागच्यासारखे वाढवावे, अशीही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

No comments