Header Ads

कोयना प्रकल्पग्रस्त कोयनामाईची शपथ घेऊन करणार जेवण बंद satara


सातारा
: कोणतीही गरीब माणसे ज्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो ते सुखासुखी आंदोलनाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. कोयना प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेला लढा कोणताही पर्याय उरलेला नसल्यामुळेच सुरू केला आहे. त्यांना एवढेच ठरवायचे आहे की, महामारीने मरायचे, उपासमारीने मरायचे की, लढून मरायचे. त्यामुळे आज त्यांनी असा निर्णय घेतला आहे की, येत्या सोमवार पासून ते सकाळचे जेवण घेणे बंद करतील, हा निर्णय कोयनेला सांगण्यासाठी कोयना जलाशय, कोयना नदी यापैकी ज्या गावाला जवळ असेल त्या ठिकाणी प्राथनिधिक स्वरूपात जाऊन या निर्णयाची शपथ घेतील.

कोयना धरण झाले आणि महाराष्ट्राला विकासाचा आधार असलेली वीज मिळाली. आणि या विजेबरोबरच कोयनेच्या पाण्यातून लाखो एकर जमीन बागायती झाली. या आधारावर सहकारी आणि खाजगी उद्योग भांडवल कमवत आहेत. अशा वेळी ६४ वर्षे उलटून गेल्या नंतर कोयना धरणग्रस्तांचे विकसनशील पुनर्वसन बाजूलाच पण साधे पुनर्वसन ही होऊ शकले नाही, याविषयी दुःख होण्याऐवजी किंवा ६४ वर्षे झालेल्या उशिराबद्दल खंत वाटण्याऐवजी उशीराचे समर्थन होणे म्हणजे या प्रकल्पग्रस्तांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. 

ही परिस्थिती गेले दहा वर्षे चालू आहे. पात्र प्रकल्पग्रस्तांची प्रमाणित यादी तयार करण्याचा निर्णय मंत्रालय पातळीवर जरी प्रथम २०१८ साली झाला असला तरी जिल्हा पातळीवर हा निर्णय २००९-१० सालीच झालेला आहे. या सर्व काळात महामारी किंवा कोणतीही साथ नव्हती. किंवा मंत्रालय पातळीवर निर्णय झाला तेव्हा २०१८-१९ ला महामारी, साथ किंवा कोरोना नव्हता, मग उशीर का झाला याचे उत्तर कोण देणार. प्रशासनाने प्रामाणिक पणे या दहा वर्षाच्या विलंबा बद्दल या धरणग्रस्तांची माफी मागितली पाहिजे. या विषयी कोठलेही समर्थन करणे म्हणजे या प्रकल्पग्रस्तांचा अवमान करण्यासारखेच आहे, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. यावेळी हरिश्चंद्र दळवी, मालोजीराव पाटणकर , सचिन कदम, महेश शेलार, चैतन्य दळवी, प्रकाश साळुंखे, सीताराम पवार रामचंद्र कदम  कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments