Header Ads

त्रिशंकू भागातील घंटागाडी टेंडर मध्ये झोलझाल; स्थानिकांच्या हक्कासाठी पालिकेच्या विरोधात उपोषण करण्याचा रवी पवारांचा इशारा satara


सातारा
: सातारा पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या खेड ग्रामपंचायत आणि त्रिशंकू भाग तसेच विलासपूर आणि त्रिशंकू भागातील कचरा उचलण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र त्रिशंकू भागातील स्थानिकांनी टेंडर भरूनही त्यांना काहीही कळू न देता दुसऱ्यालाच टेंडर देण्यात आले असून स्थानिकांवर अन्याय करण्यात आला आहे. पालिकेच्या घंटागाडीच्या टेंडर प्रक्रियेत मोठा झोलझाल झाला असून या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा पालिकेत आमरण उपोषण करू असा इशारा त्रिशंकू भागातील सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी दिला आहे. 

रवी पवार यांनी म्हटले आहे की, पालिका हद्दवाढीत समावेश झाल्यानंतर पालिकेने खेड आणि विलासपूर ग्रामपंचायत आणि त्या लगतचा त्रिशंकू भागयेथील कचरा उचलण्यासाठी घंटागाडीसाठी टेंडर मागवली होती. दरम्यान, हद्दवाढ होण्याच्या आधी गेली १७ वर्षांपासून त्रिशंकू भागातील कचरा उचलण्याचे काम काही स्थानिक लोक घंटागाडीद्वारे करत आहेत. या स्थानिकांनीही पालिकेत घंटागाडीसाठी रीतसर टेंडर भरले होते. गेल्या चार- पाच महिन्यांपासून या स्थानिकांना पालिकेचे मुख्याधिकारी व इतर कर्मचारी टेंडर तुम्हालाच देऊ, थोडं थांबा असे म्हणून झुलवत होते. काही दिवसांपूर्वी अचानक दुसऱ्याच कोणीतरी घंटागाडी सुरु केल्याचे निदर्शनास आले. याबद्दल मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे विचारणा केली असता टेंडर कधीच फुटले आहे, असे सांगून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

टेंडर फुटले तर ज्यांनी टेंडर भरले होते त्यांना का कळवले नाही? त्यांना अंधारात का ठेवले? त्यांना का झुलवत ठेवले? हे प्रश्न रवी पवार यांनी उपस्थित केले असून या टेंडर प्रक्रियेत मोठा झोल झाला आहे. भ्रष्टाचार झाल्यानेच स्थानिकांना डावलण्यात आले आहे. येत्या आठ दिवसात स्थानिकांना घंटागाडी चालवण्याची अधिकृत परवानगी बापट यांनी द्यावी. अन्यथा पालिका कार्यालयात आमरण उपोषण करू असा इशारा पवार यांनी दिला आहे. तसेच या प्रकारात काही मोठे मासे असून त्यांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी हा उद्योग केला आहे. स्थानकावरील अन्याय दूर न झाल्यास या मोठ्या मास्यांचेही कारनामे उघड करू असा इशारा पवार यांनी दिला आहे.

No comments