Header Ads

कास धरण उंची वाढवण्याचे काम लवकर पूर्ण करा : आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचना satara


सातारा
: सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सातारकरांचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी सोडवण्यासाठी कास धरण प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यापासून ते वाढीव निधी मिळवून देईपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज या प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. कास धरणाचे उंची वाढवण्याचे काम लवकर पूर्ण करून सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. 

सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १८८५ साली कास धरण बांधण्यात आले. मात्र दिवसेंदिवस सातारा शहराचा विस्तार वाढत गेला, लोकसंख्या वाढली. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कास धरणाची उंची वाढवण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. मार्च २०११ मध्ये आघाडी सरकारच्या काळात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरून तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी कास धरण प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांच्या सहकार्यामुळे राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून या प्रकल्पाला ४२ कोटी निधी मिळवून दिला. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरु झाले. मात्र कालांतराने वाढीव निधी अभावी हे काम रखडले. पुन्हा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून वाढीव निधीला प्रशासकीय मान्यता मिळवली तसेच तब्बल ५८ कोटी रुपये वाढीव निधीही मंजूर करून घेतला.

सातारा नगर पालिकेत सत्ता नसतानाही सातारकरांचा आणि सातारा शहराचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सुटावा यासाठी कायम झटणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कास धरण प्रकल्पासाठी आवश्यक असणारा वाढीव निधी मिळवून हा प्रश्‍न कायमचा मार्गी लावला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे आणि ना. अजित पवार यांच्या सहकार्यामुळे  बहुचर्चीत आणि महत्वकांक्षी कास धरणाची उंची वाढवण्याचे निधी अभावी थांबलेले काम पुन्हा सुरु झाले. कास धरणाची उंची १२.४२ मीटर वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून उंची वाढवल्यानंतर या धरणात ५०० दलघनफूट पाणीसाठा होणार आहे. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण  व्हावे, काम दर्जेदार व्हावे यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे नेहमीच लक्ष देत असून त्यांनी आज सकाळी या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, शकील बागवान, रविंद्र ढोणे, राजू गोरे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव धुळे, कास प्रकल्पाचे उप अभियंता जयवंत बर्गे, शाखा अभियंता आरिफ मोमीन आदी उपस्थित होते. 

प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून मूळ धरणाच्या शीर्ष विमोचक विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. सांडव्याचे (ओव्हर फ्लो सेक्शन) बांधकाम सुरु असून दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंतींचे कामही सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होऊन पावसाळ्यानंतर येत्या नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये धरण पूर्णक्षमतेने भरेल अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पामुळे संपूर्ण सातारा शहराचा आणि कास मार्गावरील १५ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यामुळे काम लवकरात लवकर पूर्ण करा. कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नका अशा सक्त सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

No comments