Header Ads

चार महिन्यांपासून ऊसाची देणी बाकी; पीपीई कीट घालून आता कारखान्यांसमोर आंदोलन : रयत क्रांती संघटनेचा इशारा satara


सातारा
: कारखान्यांना ऊस घातल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना बिल अदा करणे हे एफ.आर.पी. कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी कोरोनाचा आसरा घेवून तब्बल चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना देणी दिली नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून कारखान्यांनी येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांची देणी अदा करावीत. अन्यथा प्रत्येक कारखान्याच्या गेटसमोर कोरोना प्रतिबंधात्मक पीपीई कीट घालून आंदोलन करणार असल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील किसनवीर, शरयू, जरंडेश्वर, स्वराज यासह अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकवली आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना ऊस पिकाशिवाय इतर उत्पन्नाचे साधन नाही. लागवडीसाठी काढलेले कर्ज तसेच कामगार व उदरनिर्वाह करण्यासाठी बँका व इतर माध्यमातून कर्जे काढावी लागली. त्या कर्जांची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांच्यामागे तगादा सुरू आहे. असे असताना ज्या कारखान्यांना ऊस घालून चार महिन्याचा अवधी उलटून ही अद्याप बिल जमा नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. तेव्हा आता परिस्थिती सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. कारखान्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असलेली यंत्रणा चिरी मिरी मिळत असल्याने गप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची लढाई स्वतः लढावी लागणार असून त्यादृष्टीने आता दोन दिवसात कारखान्यांनी देणी अदा करावीत अन्यथा कोरोनाचे सर्व नियम पाळून व कोरोना प्रतिबंधात्मक पीपीई कीट घालून आंदोलन करणार असल्याचा इशारा साबळे यांनी दिला आहे.

No comments