Header Ads

फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेला मानसिक छळ थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन; फायनान्स कंपन्यांच्या कर्जहप्ता वसुली विरोधात ‘आप’च्या सागर भोगावकर यांचा इशारा satata


सातारा
: कोरोना संकटाने हाहाकार माजवला आहे. लॉकडाऊनने सर्वसामान्य जनतेला हातातोंडाचा मेळ बसवताना नाकीनऊ आला आहे. अशा संकटकाळातच फायनान्स कंपन्यांनी कर्जहप्त्याची वसुली सुरू केली आहे. सर्वसामान्य जनतेचा केला जाणारा मानसिक छळ तात्काळ थांबविण्यात यावा, अन्यथा आपतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरदार (सागर) भोगावकर यांनी दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता कडक निर्बंध लावत सगळी दुकाने व आस्थापना बंद केल्या आहेत. परिणामी, नागरिकांची आर्थिक घडी मोडली आहे. आपले व्यवसाय व इतर व्यवहार सुरळीत ठेवण्याकरिता नागरिकांनी फायनान्स कंपन्यांकडून कर्जे घेतली आहेत. या निर्बंधांच्या काळात देखील या कंपन्यांकडून कर्जाचे हफ्ते वसूल करण्यासाठी तगादा लावला जात आहे. यामुळे कर्जदारांचे, विशेषतः बचत गटाच्या माध्यमातून कर्जे घेतलेल्या महिलांना आर्थिक व मानसिक पिळवणुकीचा सामना करावा लागत आहे. 

अनेक वर्षांपासून सातारा जिल्ह्यामध्ये दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांना फायनान्स करणार्‍या कंपन्यांकडून अवैध पद्धतीने हफ्ते वाहनधारकांकडून वसुली सुरु आहे. फायनान्स कंपन्यांनी वसुली करण्याकरीता सातारा शहरातील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नामचीन गुंडांची नियुक्ती केलेली आहे. हे गुंड आनेवाडी टोलनाका, वाढेफाटा, शिवराज पेट्रोलपंप, खिंडवाडी याठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर रोज उभे असतात व ते गाड्यांचे हफ्ते थकलेल्या वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडून अवैधपणे वसुली करीत असतात. एकप्रकारे ही वाटमारीच आहे. या वसुलीसाठी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच वसुली करणार्‍या प्रतिनिधीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार डिआरएची परिक्षा पास होवून त्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच हफ्ते थकलेल्या वाहनाची जप्ती करावयाची असल्यास वाहनधारकाच्या राहत्या पत्त्यावर जावून तसेच त्यांना न्यायालयाची नोटीस व स्थानिक पोलिसांना याबाबतची कल्पना देवून कारवाई करणे बंधनकारक असतानाही जिल्ह्यातील फायनान्स कंपन्या कायदा हातात घेवून वाहनधारकांची गेल्या अनेक वर्षांपासून लूट करीत आहेत. हे कायद्याच्यादृष्टिने अतिशय गंभीर बाब आहे. सातारा जिल्ह्यात दररोज शेकडो गाड्या राष्ट्रीय महामार्गावर तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी रस्त्यांवर रात्री-अपरात्री अडवल्या जातात व त्यांच्याकडून जबरदस्तीने रोख रक्कमेची व मौल्यवान वस्तूंची लूट केली जाते. अशा नियमबाह्य पद्धतीने सुरु असलेल्या रोड रॉबरी करणार्‍या फायनान्स कंपन्यांच्या गुंडांवर आपण कडक कारवाई करावी, ही नम्र विनंती.

जोपर्यंत शासनाचे निर्बंध आहेत, व सर्व व्यवहार सुरळीत चालु होत नाहित, तोपर्यंत कर्जाचे हफ्ते वसुली थांबवून मुदतवाढत देण्यासाठी सदरच्या फायनान्स कंपन्यांना त्वरित निर्देश व्हावेत अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे आपल्याकडे करीत आहे. 
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदिप जगताप, उत्तमराव सावंत, महेंद्र बाचल, विजयकुमार धोतमल, अ‍ॅड. इम्तियाज खान,  अ‍ॅड. विकास साबळे, आसिफ पठाण, प्रा.चव्हाण, अतुल भोसले, विशाल कोळी, कुलदीप भोगावकर, प्रिया तोरस्कर, दिपेंती चिकणे, शिवाजी जाधव, अ‍ॅड. मंगेश महामुलकर, अ‍ॅड. भिसे, बापू सोरटे, संजय पवार, संदीप माने, डॉ.मधुकर माने, अ‍ॅड. विजय खामकर, संजय भोसले, सुनिल शिंदे यांची उपस्थिती होती.

No comments