Header Ads

शासनाचे 1500/- आणि नगरपरिषदेचे 1000/- असे 2500/- रुपये फेरीवाल्यांना प्रदान करणार : खा.उदयनराजे भोसले satara


सातारा
: साता-यातील फेरीवाल्यांचे आवश्यक ते सर्वेक्षण यापूर्वीच झालेले आहे. फेरीवाल्यांप्रती सहानुभुतीमुळे टिका करणा-यांनी याबाबतची थोडीतरी माहीती घेतली असती तर वस्तुस्थिती त्यांना समजली असती. सध्याच्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत , अकारण संभ्रमावस्था निर्माण होण्यास हातभार न लावता, आत्यावश्यक असेल तेथे संबंधीतांनी प्रशासनास यथोचित सहकार्य करावे अशी आमची सर्वाना विनंती राहील, अश्या स्पष्ट शब्दात खुलासा करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फेरीवाल्यांसह गोरगरिब नागरीक आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत.त्यामुळे फेरीवाल्यांना पात्र लाभ देण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे आश्वस्त उद्गार एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केले आहेत.

सातारा नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे फेरीवाल्यांचे नुकसान अश्या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या वृत्ताचे साधार खंडन करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, सातारा नगरपरिषद आणि फेरीवाला संघटना यांच्या संयुक्त माध्यमातुन सातारा शहरातील 1621 पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. त्यापैकी मा.पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेमधुन सन 2020-21 मध्ये 754 पथविक्रेत्यांचे खात्यात रुपये 10 हजारांची रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे. तर या व्यतीरिक्त 867 फेरीवाल्यांची प्रकरणे मंजूर असून, रक्कम प्रदान करण्याच्या प्रक्रीयेमध्ये आहेत.

मा.मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली रुपये 1500/- ची फेरीवाला मदत संबंधीत पात्र पथविक्रेत्यांना प्रदान करण्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही. याकामी शासनाचे निर्देश ज्या प्रमाणे प्राप्त होतील त्यानुसार फेरीवाल्यांना रुपये 1500/- नुकसान रक्कम सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन प्रदान केले जातील. सध्याची आपत्कालीन परिस्थिती पहाता, टिका करणा-यांना नीट माहीती मिळाली असती त्यांनी अशी टिका केली नसती हे आम्ही जाणतो. म्हणूनच केलेल्या टिकेला सकारात्मकतेने खुलासा वजा माहीती देत आहोत असे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच राज्यशासनाने रुपये 1500/- रुपयांची घोषित केलेली रक्कम तुटपुंजी असली तरी दिलासा देणारी आहे. म्हणूनच त्या रक्कमेत सातारा नगरपरिषदेच्या स्व निधिमधुन आणखीन रक्कम रुपये 1000/- प्रतिफेरीवाला देण्याबाबत आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला आहे. फेरीवाल्यांप्रती पारदर्शी धोरण राबविणेत येणार आहे. कोरोनाच्या कठीण पार्श्वभुमीवर प्रसंगी सातारा विकास आघाडीच्या व्यक्तीगत स्तरावरुन देखिल शासन घोषणेप्रमाणे आर्थिक मदत दिली जाईल असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण यापूर्वीच झालेले असल्याने, शासन घोषणेप्रमाणे आणि निर्देशाप्रमाणे रुपये

1500/- आणि नगरपरिषदेचे रुपये 1000/- अशी दिलासा रक्कम पात्र फेरीवाल्यांना लवकरच प्रदान केली

जाईल. कोणतीही पात्र व्यक्ती आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही असेच धोरण नगरपरिषदेच्या

स्तरावर राबवले जाणार आहे. त्याबद्दल कोणीही संभ्रम करुन घेवू नये असे देखिल खासदार श्रीमंत छत्रपती

उदयनराजे भासले यांनी शेवटी नमुद केले आहे.

No comments