Header Ads

जिहे-कटापूर योजनेसाठी केंद्रातून निधी देण्याचे केंद्रीय जलशक्तीमंत्री शेखावत यांचे खा.उदयनराजेंना आश्वासन satara


सातारा
: माण खटाव तालुक्याच्या विकासात भर घालणाऱ्या माननीय गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार अर्थात जिहे-कटापूर या महत्त्वकांक्षी योजनेस केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नुकतेच ५३७ कोटी रुपये दिले असून ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी जलशक्ति मंत्रालयाकडून आवश्यक तो निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिले. या योजनेच्या पूर्ततेसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून मागणीचे निवेदन दिले. 

यावेळी बोलताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले कि, जिहे-कटापूर या योजनेमुळे २७५०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून या योजनेमुळे माण खटाव तालुक्यातील ६७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. या योजनेमुळे या ६७ गावांमधील सुमारे २७५०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून या परिसरातील दुष्काळ निवारणास उपयुक्त ठरणार आहे. याआधी महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्पासाठी केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र काही प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्रातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी  माझे प्रयत्न सुरू खासदार उदयनराजे यांनी सांगितले.


यावेळी खासदार उदयनराजे यांनी शिवकालीन तळ्यांचा पुनर्विकास करण्याबाबत केंद्रीयमंत्री शेखावत यांच्याशी चर्चा केली. सातारा जिल्ह्यात सुमारे २० गड किल्ले असून यातल्या अनेक गड किल्ल्यांवर शिवकालीन तळी अस्तित्वात आहेत. या शिवकालीन तळ्याचा जिर्णोध्दार करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात छत्रपती उदयनराजे यांनी केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशी चर्चा केली. यावेळी बोलताना शेखावत यांनी या सर्व किल्ल्यांवरील जलस्रोतांचा अभ्यास करून त्यासंदर्भात कोणत्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देता येईल, याबाबत प्रशासकिय पातळीवर माहीती घेवून विशेष निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 


गड किल्ल्यांवरील जलस्त्रोत मजबूत करण्यासाठी किल्ल्यांवरील शिवकालीन तळ्यांचा विकास कसा करायचा? तसेच ही तळी नेमकी कशी स्वच्छ करायची याबाबतचा अहवाल शासनामार्फत मागविण्यात येईल. त्यानंतर या प्रकल्पावर ती कोणत्या माध्यमातून निधी देता येईल याचीही पाहणी केली जाईल असे शेखावत त्यांनी यावेळी सांगितले


या भेटीदरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कृष्णानदीच्या शुद्धीकरणा बाबतही केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशी चर्चा केली. कृष्णा नदीच्या उगमापासून संगमापर्यंत कृष्णा नदी प्रदूषण मुक्त करण्यासंदर्भात नेमकी काय उपाययोजना करता येईल. याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या माध्यमातून काही उपाययोजना करता येईल का?याबाबत शेखावत यांच्याशी चर्चा केली. यावेळी बोलताना शेखावत यांनी या नदी प्रदूषणाचा बाबतच्या वेगवेगळ्या घटकांची माहिती दिली तसेच प्रदूषण कमी करण्यासंदर्भात नेमकी उपासयोजना काय करायची याचा सविस्तरपणे आढावा घेवून पुन्हा चर्चा करण्याचे आश्वासन शेखावत यांनी दिले.

No comments