Header Ads

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रयत क्रांती संघटनेचा रविवारी शेतकरी मेळावा satara


सातारा
: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रयत क्रांती संघटनेचा रविवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. जळगाव, ता. कोरेगाव येथे जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच  ह्यावेळी जिल्ह्यातून बहुसंख्येने शेतकरी व रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

शेतकरी मेळाव्यात प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाची एक रक्कमी एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली नाही. अशा कारखान्यांना आणि प्रशासनाला इशारा देण्यासाठी आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे सत्तेत आल्या आल्या मोफत वीज देण्याची घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना भरमसाठ रक्कमेची बिले पाठविली आहेत. ती बिले सरसकट माफ केली पाहिजेत, अन्यथा महाविकास आघाडी सरकार आणि वीज वितरणाच्या प्रत्येक तालुका स्तरीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याबाबत आ.सदाभाऊ खोत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मागील वर्षातील तब्बल दहा महिने शाळा ह्या कोरोनाने बंद होत्या. तरी देखील शाळांनी संपूर्ण एक वर्षाची फी आकारून ती सक्तीने वसूल करण्यासाठी पालकांच्या मागे सासेमिरा लावला आहे. त्यामुळे अशा शाळांच्या विरोधात देखील आंदोलन छेडण्याचा महत्वपूर्ण निर्णय मेळाव्यात घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव व युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

No comments