Header Ads

पत्रकारांना कोरोना लसीबाबत प्रस्ताव पाठवणार; जिल्हाधिकारी शेखर सिंह : जिल्हा पत्रकार संघाची मागणी satara


सातारा
: पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोरोना संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस यांच्याप्रमाणेच पत्रकारांनीही ग्राऊंडवर उतरुन फ्रंटलाईनला राहून लोकसेवा केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पत्रकारांना कोरोना लस उपलब्ध करावी, अशी मागणी सातारा जिल्हा पत्रकार संघाने केली. दरम्यान, सातार्‍यातील पत्रकारांच्या या मागणीचा प्रस्ताव आपण राज्य शासनाला पाठवणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दिपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ट पत्रकार जीवनधर चव्हाण, राहूल तपासे यावेळी उपस्थित होते. गुरुवारी जिल्हाधिकारी यांना भेटून याबाबतचे  निवेदन देण्यात आले.

हरीष पाटणे म्हणाले, सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर असताना पत्रकार ग्राऊंडवर होते. आरोग्याचा बाका प्रसंग असतानाही पत्रकार खरी व वस्तुनिष्ठ माहिती  जनतेपर्यंत पोहोचवत होते. लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाचे सर्व प्रयत्न लोकांपर्यत पोहचवले. सर्वसामान्य जनता व शासन-प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांनी या कालावधीत प्रचंड मेहनत घेवून काम केले. सातारा जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनाही कोरोनासारखा दुर्धर आजार झाला तसेच चार पत्रकारांचे बळीही गेले.

दिपक प्रभावळकर म्हणाले, गेल्या 15 दिवसांपासून शासनामार्फत फ्रंटलाईनला काम करणार्‍या घटकांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. नर्सेस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, महसूल व शासकीय कर्मचारी यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम संपत आला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पत्रकारांसाठीचा मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम तातडीने आयोजित करावा. सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस मिळावी. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये याबाबत आरोग्य विभागाला कॅम्प, शिबिरे आयोजित करण्याच्या सुचना आपल्या स्तरावरुन जाव्यात. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांनी कोरोनाच्या काळात प्रचंड योगदान दिले आहे.

विनोद कुलकर्णी म्हणाले, सातारा जिल्हा पत्रकार संघानेही संपूर्ण कोरोना काळात जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले आहे. भविष्यातही संकटाच्या काळात आमची सहकार्याचीच भूमिका आहे. आमच्या निवेदनाची दखल घेवून आपण तातडीने कोरोना प्रतिबंधक लस पत्रकारांसाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली. यावर बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, जिल्ह्याचा कार्यभार घेतल्यानंतर लगेचच कोरोनाचे संकट आले. या कालावधीमध्ये जिल्ह्यातील पत्रकार बांधवाचे प्रशासनाला मोलाचे सहकार्य ंझाले आहे. लसीबाबत पत्रकारांची मागणी रास्त आहे. मात्र राज्य सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे अद्यापतरी पत्रकारांना लस देण्याबाबत सूचना नाही. सातार्‍यात पत्रकारांनी केलेल्या मागणी लक्षात घेवून आपण लगेचच प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, सुजीत आंबेकर, दिपक दिक्षीत, तुषार तपासे, अमित वाघमारे, सनी शिंदे, संतोष नलवडे, प्रशांत जगताप, ओंकार कदम, साई सावंत, उपस्थित होते.

No comments