Header Ads

कास धरण उंची वाढवण्याचे काम १५ मे पर्यंत पूर्ण करा; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सूचना satara


सातारा
: कास धरण उंची वाढवण्याचे काम वाढीव निधी अभावी रखडले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे या प्रकल्पासाठी वाढीव ५७.९१ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. कास धरण प्रकल्प हा सातारा शहर आणि कास परिसरातील आसपासच्या १५ गावांसाठी महत्वाचा आहे. यासाठी निधी उपलब्ध झाला असून हा जिव्हाळ्याचा प्रकल्प तातडीने पूर्ण झाला पाहिजे. उर्वरित राहिलेले काम पाहता येत्या १५ मे पर्यंत कास धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. 

वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. ना. अजित पवारांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरुन या प्रकल्पाला मंजूरी दिली होती त्याच ना. पवारांनी काही दिवसांपुर्वी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याच मागणीवरुन कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५७.९१ कोटी निधी मंजूर करून दिला. कास प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरु व्हावा आणि सातारकरांचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवार दि. २० रोजी कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते. बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कास धरण प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. सातारा शहर आणि कास मार्गावरील सुमारे १५ गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी हा प्रकल्प मार्गी लावणे अत्यावश्यक आहे. ना. अजित पवार यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प मंजूर झाला आणि त्यांच्याचमुळे आता हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध झाला आहे. 

सर्व प्रकारचे शासकीय सोपस्कार पूर्ण करून तातडीने  कामाला प्रारंभ करा. राहिलेली कामे त्वरित हाती घेऊन ती लवकरात लवकर पूण करा. या प्रकल्पाचे काम दर्जेदार करून ते वेळेत पूर्ण करा आणि या भव्यदिव्य प्रकल्पाला सातारकरांच्या सेवेत लवकर रुजू करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.  

No comments