Header Ads

मुख्यमंत्री निधीतील मदतीसाठी स्टँप, नोटरी बंधनकारक नाही; प्रहार जनशक्ती पक्षाचे गौरव जाधव यांच्या मागणीला यश satara


सातारा
: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय कारणासाठी मदत मागणाऱ्या कोणत्याही रूग्णांना यापुढे स्टँप पेपर व नोटरी करून देणे बंधनकारक नसून, याबाबत प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केलेल्या मागणीला यश आले आहे.


मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदत मिळविण्याकामी दाखल करावयाच्या कागदपत्रांमध्ये कोणताही शासकीय नियम नसताना देखील साताऱ्यातील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक संबंधित रुग्णांकडून शंभर रूपयेचा स्टँप पेपर व नोटरी करून घेत होते. नुकत्याच एका गरीब रूग्णाकडून त्यांनी स्टँप पेपर व नोटरी करूनच कागदपत्रे दाखल करण्याच्या कार्यपद्धतीचा अवलंब केला. संबंधित रुग्णांने जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्विय सहाय्यक गौरव जाधव यांच्याकडे तक्रार केली. गौरव जाधव यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना या नियमबाह्य कार्यपद्धती बाबत सुनावले तरीही जिल्हा शल्यचिकित्सकांनी या पद्धतीत बदल केला नाही. यावर गौरव जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयीन उपसचिव गायकवाड यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत मदतीची याचना करणाऱ्या संबंधित रूग्णांना नाहक खर्च व त्रास होत असल्याचे सांगितले. यावर उपसचिव गायकवाड यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या या नियमबाह्य कार्यपद्धतीचा चांगलाच समाचार घेऊन  कान उघाडणी केली. आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदत मागणाऱ्या कोणत्याही रूग्णांकडून शंभर रुपयेचा स्टँप व नोटरी न घेण्याचे आदेश दिले.


या आदेशामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय कारणासाठीआर्थिक मदत मागणाऱ्या कोणत्याही रूग्णांना नाहक खर्च करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. तर या पुढे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय कारणासाठी मदत मागणाऱ्या रूग्णांना स्टँप पेपर व नोटरी करून मागितले तर संबधितांनी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे लेखी तक्रार करावी असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्विय सहाय्यक गौरव जाधव यांनी केले आहे.

No comments