Header Ads

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाईन कालावधीत सूट द्या : आ. शिवेंद्रसिंहराजे satara

सातारा : सातारा- जावली मतदारसंघासह सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील असंख्य लोक नोकरी, कामधंद्यानिमित्त मुंबई, नवी मुंबई परिसरात राहत आहेत. हे चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या मूळ गावी मोठ्या संख्येने येत असतात. महाराष्ट्र शासनाने कोकण विभागातील चाकरमान्यांसाठी १४ दिवसांचा असलेला क्वारंटाईन कालावधी कमी करून तो १० दिवस केला आहे. त्याच धर्तीवर मुंबईहून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांनाही क्वारंटाईनचा कालावधी १० दिवसांचा करावा अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. निवेदनात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीपासून बचावासाठी शासनाने घालून दिलेली बंधने, अटी, नियम आणि सूचनांचे पालन करणे हे प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. काही दिवसांवर गणेशोत्सवचा सण आला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील असंख्य लोक नोकरी, कामधंद्यानिमित्त मुंबई, नवी मुंबई परिसरात राहत आहेत. हे चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या मूळ गावी मोठ्या संख्येने येतात. गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने कोकण विभागातील चाकरमान्यांसाठी १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी कमी करून तो १० दिवस केला आहे. त्याच धर्तीवर मुंबईहून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांनाही क्वारंटाईनचा कालावधी १० दिवसांचा करणे आवश्यक आहे. 

गावाकडे येणारे चाकरमानी हे काही दिवसांसाठीच गावाकडे येतात आणि सण संपला कि लगेच ते नोकरीच्या ठिकाणी परततात. त्यांना १४ दिवस क्वारंटाईन ठेवल्यास त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. याचाच विचार करून शासनाने कोकण विभागात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी क्वारंटाईनचा कालावधी १० दिवसांचा केला आहे. त्यामुळे कोकणाप्रमाणेच सातारा जिल्ह्यात गणेशोस्तवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठीही १४ ऐवजी १० दिवस क्वारंटाईन कालावधी ठेवावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन ना. पाटील यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले. 

No comments