Header Ads

मंदिरे बंद मात्र मदिरा गृह चालू; रावणा नंतर देवदेवतांना बंदिवासात टाकण्याचे पाप सरकार थांबवणार तरी कधी ? : बंडातात्या कराडकर satara

सातारा : उध्दवा अजब तुझे सरकार..... ग.दि.माडगूळकरांचे हे भावगीत प्रसिध्द आहे. त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की,पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मनीहार. त्याच धर्तीवर असे म्हणावे लागते की, कथा, कीर्तनांना पायबंध आणि दारूस मुक्तद्वार... उध्दवा अजब तुझे सरकार. गेली पाच महिने संपूर्ण देशात कोरोनाचे थैमान चालू आहे. अत्यंत भयावह नसतानाही त्याचा धसका सर्व सामान्य माणसांनी घेतला आहे. मिडीयाने सामान्य माणसास घाबरवून सोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारी काही डाॅक्टरांची जात या संधीचा फायदा न घेतील तर कसे? त्यांनी पाॅजिटीव्ह नसताना अनेक पेशंट पाॅजिटिव्ह दाखवून नविन व्यवसाय सुरू केला. "खळग्यास डबरा जामिन" या न्यायाने काही राजकिय लोकांनी या जातीला प्रोत्साहन देवून एकमेकांच्या सहमताने लोकांची लुट सुरु केली आहे. सध्या खाजगी दवाखान्यात एका पेशंटचा खर्च सुमारे तीन ते पाच लाखांच्या घरात आहे आणि एवढा खर्च सामांन्य माणसांना परवडत नाही. त्यामुळे डाॅक्टर्स त्या माणसाची आर्थिक परस्थिती पहावून त्याला पाॅजिटीव्ह-निगेटीव्ह ठरवित आहेत का असा प्रश्न सर्व सामांन्यांना पडला आहे.


केंद्र सरकारच्या माध्यमातून  एका रूग्णासाठी दिड लाखाचे अनुदान मिळत असल्याचे बोलले जाते. म्हणूनच की काय अनेक दवाखान्यांना कुरण निर्माण करून दिले आहे. त्यामुळे उत्तरोत्तर शहरातच जास्त रूग्ण पाॅजिटिव्ह होत आहेत व हा साखळी व्यवसाय वाढतच चालला आहे. लाॅकडावून मध्ये आपण सर्वात प्रथम दारू व्यवसाय खुला करून दारूच्या व्यसन करणारांना दिलासा दिलात. त्यामुळे मद्यपी लोक आपल्या सरकारला आशिर्वाद देतील.मात्र त्यांच्या घरातील कुटुंबिय शिव्या-शाप दिल्या शिवाय रहाणार नाहीत. महसुलासाठी सर्वात नफ्याचे जास्त प्रमाण असलेला हा व्यवसाय सरकारी तिजोरी भरण्यासाठी जास्त उपयुक्त असल्याने  त्याला प्राधान्य देणे आपल्या सरकारचे नैतीक कर्तव्य ठरते का? आज मितीला दारूची दुकाने हाउसफुल्ल चालली आहेत व आपल्या सरकारचा महसुल वाढत चालला आहे. हे सर्व करताना आपल्या सरकारने कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून भजन,कीर्तन, मंदिरे पूर्ण बंद ठेवून लोकांचे आरोग्य धोक्यात येवू नये याची काळजी घेतल्या बद्दल धन्यवाद! 


परंपरेने चाललेल्या वार्‍या,यात्रा पूर्ण बंद करून आपल्या सरकारने भाविकांच्या भावनेवर वज्राघात केला आहे. १९० वर्षांनी ज्ञानोबारायांचा सोहळा पूर्ण थांबवला. अगदी ५० लोकांसह पालखी नेण्यासही आपल्या सरकारने बंदी केली. पंढरी निर्माण झाल्यापासून प्रथमच आषाढी वारी ओस पडली. रावणा नंतर सर्व देवदेवता बंदीवासात टाकण्याचे श्रेय आपल्या सरकारलाच मिळते. सध्या दवाखाने,दारूदुकाने, किराणा दुकान, मंडई इ.ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. लग्न समारंभ, मटनाच्या चालणार्‍या पार्ट्या तेथे आपल्या सरकारने कोरोनाच्या जंतूना जाण्यास सक्त मनाई केली असून मंदिरा मध्ये मात्र त्यांना मोकळीक दिली आहे का? अगदी दहा-पंधरा लोकांनी भजन-वाचन केले तरी आपले प्रशासक त्यांच्यावर गुन्हा नोंदवत आहेत. मात्र दारूच्या दुकानांकडे मात्र कोणाचे लक्ष अथवा नियंत्रण नाही. यालाच धर्माचे सरकार म्हणतात का? हे असेच कुठपर्यंत चालायचे! आषाढी वारीला आम्ही मुकलो आता कार्तिक वारीकडे आमचे डोळे लागलेत. भगवान करो आपल्या सरकारच्या मनात वारकरी व भाविक लोकांबद्दल सहानुभूती निर्माण होवो व लाॅकडावूनचा खोडा लवकर निघो हिच श्री पांडूरंग चरणी प्रार्थना.

No comments