Header Ads

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ जवानांचे पथक दाखल; पूरग्रस्त गावातील तरुणांना देणार प्रशिक्षण satara

सातारा : संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड- पाटण तालुक्‍यासाठी एनडीआरएफ जवानांचे पथक दाखल झाले आहेत. एक अधिकारी आणि 21 जवान या पथकात असून, पूरस्थितीत दोन्ही तालुक्‍यांत हे पथक मदतीसाठी तत्पर असणार आहे. ऑगस्ट अखेरदरम्यान हे पथक येथे कार्यरत असणार असून, दोन्ही तालुक्‍यांतील पूरग्रस्त गावांत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखवून जवान तरुणांचे प्रशिक्षणही घेणार आहेत. लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर पूरग्रस्त गावातील तरुणांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. येथील कृष्णा- कोयनेच्या प्रीतिसंगमावर आपत्ती व्यवस्थापनाचे आज प्रशिक्षण घेण्यात आले. त्या वेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ताम्हाणे, एनडीआरएफचे अधिकारी सचिन नलवडे, तहसीलदार वाकडे, मंडल अधिकारी महेश पाटील, तलाठी संजय जंगम यांच्यासह पालिका, पोलिस यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार वाकडे म्हणाले, पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या विशेष प्रयत्नातून कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांसाठी एनडीआरएफचे पथक आज येथे दाखल झाले आहे. संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालिका आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांना बचावासाठीचे व बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एनडीआरएफचे अधिकारी नलवडे यांनी कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील पूरग्रस्त गावात जाऊन ग्रामस्थांना पुरामध्ये स्वतःचा बचाव कसा करावा, तसेच संकटातील व्यक्तीला आपण कसे वाचवू शकतो, याचे प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगितले.

No comments