Header Ads

पाचगणीतील व्यापाऱ्याची खासगी सावकारीतून आत्महत्या satara

पाचगणी : खासगी सावकारांकडून होणारा व्याजाचा तगादा आणि फायनान्स कंपनीने फसवल्याने पाचगणी येथील व्यापाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी सहा खासगी सावकारांसह फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रशांत जयवंत शिंदे (वय 53, रा. पाचगणी) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी रोहन प्रशांत शिंदे (वय 24, रा. वसंत जाम सेंटर, मेन रोड, पाचगणी) यांनी फिर्याद दिली आहे. आदित्य रमेश पारठे (वय 27, रा. महाबळेश्‍वर) व शंकर महादेव कांबळे (वय 27, रा. पाचगणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादीतील माहितीनुसार, प्रशांत शिंदे यांनी आदित्य पारठे याच्याकडून एक लाख, शंकर कांबळे याच्याकडून 40 हजार, प्रकाश गोळेकडून (रा. पाचगणी) 60 हजार आणि दीपक कुंदा (रा. मुंबई) याच्याकडून 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते. हे पैसे व व्याजासाठी या सावकारांकडून वेळोवेळी फोनवरून, तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांना त्रास दिला जात होता.

दरम्यान, प्रशांत शिंदे यांनी "आदर्श फायनान्स'च्या जाहिरातीतील मोबाइल नंबरवर संपर्क केला. फोनवर बोलणाऱ्या अमोल पाटील व रोहन काळे अशी नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी त्यांना दोन टक्के व्याजाने कर्ज देण्याचे आमिष दाखवून, हे कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी त्यांनी दिलेल्या अकाउंटवर वेळोवेळी दोन लाख 33 हजार 490 रुपये भरले. मात्र, या कंपनीकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर झाले नाही. खासगी सावकारांच्या वारंवार पैसे मागण्याच्या त्रासाला कंटाळून व आदर्श फायनान्सने केलेल्या फसवणुकीमुळे प्रशांत शिंदे यांनी विषारी औषध घेतले. त्यात त्यांचा काल (ता. 23) मृत्यू झाला. पोलिसांनी आदित्य पार्टे, शंकर कांबळे, प्रकाश गोळे, दीपक कुंदा, अमोल पाटील, रोहन काळे या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आदित्य पार्टे, शंकर कांबळे यांना अटक केली असून, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पाचगणीचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. कदम तपास करीत आहेत. 

No comments