Header Ads

वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयामध्ये १५ बेडचा आणखी एक अतिदक्षता विभाग तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश satara

सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनाने मृत्यू होण्याचा वेग वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर गंभीर रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये 15 बेडचा आणखी एक अतिदक्षता विभाग (आयसीयू) तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात थोड्याच कालावधीत 36 बेडच्या आयसीयूची सुविधा उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. हा हा म्हणता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २ हजार ८५२ वर पोचली आहे. दररोज सरासरी ८० ते ९० कोरोना बाधितांची भर पडत आहे. बाधितांची रुग्णसंख्या वाढल्यामुळे साहजिकच गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पूर्वीचे आजार असलेल्या वृद्धांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना होणारा त्रास वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे गंभीर परिस्थितीत असलेल्या रुग्णाला कृत्रिम श्‍वासोच्छवासाची आवश्‍यकता भासत आहे. तसेच त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करावे लागत आहेत. जिल्हा रुग्णालयाची एक महिन्याची परिस्थिती पाहता अतिदक्षता विभागात केवळ सहा व्हेंटिलेटर्सच उपलब्ध होते. सुरवातीच्या टप्प्यामध्ये रुग्णसंख्या कमी असताना गंभीर रुग्णांची संख्याही कमी होती. त्यामुळे या अतिदक्षता विभागामध्ये उपचार होत होते. परंतु, रुग्णसंख्या वाढल्यामुळे सध्या उपलब्ध असलेले सर्वच सहा बेड व व्हेंटिलेटर्स केवळ कोरोनाच्या रुग्णांना लावावे लागतात. काही वेळा त्यापेक्षाही जादा रुग्ण गंभीर होण्याची परिस्थिती निर्माण होत होती. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, मेंदूतील रक्तस्त्राव, सर्पदंश, विषारी औषध पिलेले, श्‍वसनाचे आजार यातील गंभीर रुग्णांना कृत्रिम श्‍वासोच्छवास व अतिदक्षता विभागातील उपचारांपासून वंचित राहावे लागत होते.

दरम्यान, एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना बाधितांचा मृत्यूदर कमी आणण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी जिल्हा रुग्णालयात १५ बेडचा नवीन अतिदक्षता विभाग सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचे काम पूर्ण होऊन आठ दिवसांपूर्वीच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्याचे उद्‌घाटन केले. आता नवीन आयसीयू सुरू झाला. गेल्या 15 दिवसांत कोरोनाची संख्या दीड हजाराच्या आसपास वाढली आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. सध्या जुना व नवीन अतिदक्षता विभागही गंभीर रुग्णांनी भरलेला आहे. दररोज शंभराच्या पटीत येणाऱ्या रुग्णांमध्ये गंभीर रुग्णही आहेत. त्यामुळे त्यांना सुविधा द्यायची कशी, असा प्रश्‍न निर्माण होतो आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक घेऊन समस्या व काय उपाययोजना करता येतील, हे जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात आणखी 15 बेडचा आयसीयू तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याबाबत बांधकाम विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. बांधकाम विभागाचे काम झाल्यानंतर आयसीयूसाठी आवश्‍यक साहित्यांची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लवकरच 36 बेडची आयसीयू सुविधा उपलब्ध होणार आहे. कोरोना बाधितांच्या संख्येमुळे जिल्हा रुग्णालयात वॉर्डही वाढवावे लागत आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या परिचारिका व सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत आहे. त्याचा विचार करून जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त परिचारिका व सफाई कर्मचारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार काही कर्मचारी उपलब्धही झाले आहेत.

No comments