Header Ads

कलेक्टर साहेब ४२० सरपंच अपात्र करा; अन्यथा स्वातंत्र्यदिनी सामुहिक आत्मदहन : संजय गाडे satara

सातारा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ७ नुसार २६ जानेवारी २०१८ ची ग्रामसभा न घेणाऱ्या ४२० सरपंचाना १५ ऑगस्ट पुर्वी तात्काळ अपात्र करावे. अन्यथा शेकडो कार्यकर्ते स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) सातारा जिल्ह्याकडून ६ जुलै रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना देण्यात आले आहे.

सन २०१८ साली तथाकथित ग्रामसेवक संघटनेने २६ जानेवारी रोजी संप पुकारला होता. खरे तर संपाच्या आडून संविधानालाच आव्हान देणेचा तो असफल प्रयत्न होता. त्या असंविधानिक फतव्याला बळी पडून जिल्हयातील निम्म्याहून अधिक ग्रामसेवकांनी २६ जानेवारीच्या ग्रामसभेलाच गैरहजेरी लावली. ग्रामसेवक हे ग्रामसभेचे सचिव असतात तर सरपंच हे अध्यक्ष असतात. काही कारणास्तव २६ जानेवारीच्या ग्रामसभेला ग्रामसेवक गैरहजर राहिल्यास विद्यमान सरपंच यांनी अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक अथवा शासकीय कर्मचारी यांची ग्रामसभेचे सचिव म्हणून नियुक्ती करून ग्रामसभा घेणे बंधनकारकच असते. २६ जानेवारीची ग्रामसभा घेऊन त्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवायचा असतो. तशा पुर्वसुचना/ आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प सातारा यांनी कळविले असतानाही सातारा जिल्हयातील ४२० सरपंच यांनी जाणिवपूर्वक हेतूपुरस्पर ग्रामसभा घेणेचे टाळले आहे. त्यामुळे सदर सरपंच हे सरपंचपदासाठी अपात्र ठरत असल्याने, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ७ प्रमाणे त्यांचेवर अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकारी सातारा यांनी १५ ऑगस्टपुर्वी करावी.

२६ जानेवारी रोजी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली त्याच दिवशी प्रजासत्ताक दिनी एक प्रकारे घटनाच असणाऱ्या ग्रामपंचायत अधिनियमाची अवहेलना सरपंचाकडून झाली म्हणून कोरेगांव तालुक्यातील वाघोली गावचे सरपंच बशिरखान कादिरखान पठाण यांना तत्कालिन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी अपात्र केले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ४२० सरपंचांना अपात्र करुन प्रशासनाने धर्मनिरपेक्षता जोपासावी. अन्यथा "जात बघून निवाडा " करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ डॉ.राजेंद्र गवई साहेब यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली, पाश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे, जिल्हाप्रभारी हेमंत भोसले यांचे मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते, स्वातंत्र्यदिनी सामुहिक आत्मदहन करतील. या आशयाचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना दिले असून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मेलव्दारे पाठवले असल्याने मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिक कारवाईसाठी राज्याचे मुख्यसचिव अरविंद कुमार यांचेकडे पाठवण्यात आले आहे.

ग्रामसभा न घेणारे सरपंच पुढील प्रमाणे :- जावळी - १२०, कराड - ९२, पाटण - ७१, माण - ४८, खंडाळा - ३५ व उर्वरित तालुक्यातील अश्या ४२० सरपंचांपैकी अनेकांचा ४२० पणा (फसवेगिरी) अंगलट येणार असल्याने सरपंचांचे धाबे दणाणले असून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत.

No comments