Header Ads

पतीच्या खूनप्रकरणात न्यायालयाने ठोठावली पत्नीला अडीच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा satara

कराड : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पेटवून देऊन पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीला दोषी धरून न्यायालयाने अडीच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी नुकतीच ठोठावली. सीता बाळू रोकडे (वय 37, रा. रिसवड-गोवारी, ता. पाटण) असे आरोपी पत्नीचे नाव असल्याची माहिती सहायक सरकारी वकील ऍड. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

सरकारी वकिलांकडून देण्यात आलेली माहिती अशी, रिसवड येथील बाळू रोकडे याचे गावातीलच एका युवतीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पत्नी सीता हिच्या मनात होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याकडे पती बाळू दुर्लक्ष करून त्या युवतीशी अधिकच संबंध ठेवत असल्याचे पत्नी सीताच्या निदर्शनास आले. 20 डिसेंबर 2017 रोजी झोपेतून उठल्यानंतर पहाटे बाळू घरातील चुलीजवळ बसला होता. त्या वेळी सीताने त्याच्या अनैतिक संबंधाबाबत त्याला खडसावले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्या वेळी सीताने बाळूच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. यावेळी भाजलेल्या अवस्थेत बाळू शेजारी असणाऱ्या नातेवाईकांकडे धावत गेला. पत्नी सीताने अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने हेळवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पत्नी सीता हिच्यावर कोयनानगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी पत्नी सीता रोकडे हिला अडीच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ऍड. मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने खटल्याकामी नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

No comments