Header Ads

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सातारा पालिकेचे सर्वेक्षण पथक सज्ज; २० टीम तैनात satara

सातारा : कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे शहरातील प्रसार रोखण्याचा एक भाग म्हणून पालिकेकडून संपूर्ण शहरामध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी २० टीम तैनात करण्यात आल्या आहेत. लॉकडाउननंतर पहिल्यांदा सातारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. शहरातील जवळपास प्रत्येक भागात व शहराच्या चोहोबाजूने कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यामध्येही तशीच परिस्थिती या १५ दिवसांत निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांत दिवसाला ७० ते १०० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आणखी प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे पुन्हा लॉकाडाउन सुरु केले आहे. लॉकडाउनचे सुरवातीचे पाच दिवस दवाखाने व मेडिकल वगळता सर्व अत्यावश्‍यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरातही सर्व नागरिक घरात असणार आहेत. लॉकाडाउनच्या या संधीचा फायदा घेण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या कालावधीत संपूर्ण शहरामध्ये सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये श्‍वसनाचा त्रास असलेल्या सारी व आयएलआयची लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती घेतली जाणार आहे.

शहरातील प्रत्येक घरात याबाबतचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात साताऱ्यातील नागरिकांचे आरोग्य, प्रत्येक कुटुंबाची तपशीलवार माहिती व कुटुंबात पुणे व मुंबई येथून आलेले आप्तस्वकियांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यासाठी २० पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये पालिकेचे कर्मचारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य अधिकारी अशांचा समावेश असणार आहे. प्रत्येक पथकात चार ते पाच जणांचा समावेश करण्यात आलेला आहे. पथकातील कर्मचारी प्रत्येक कुटुंबाच्या प्रमुखासह सदस्यांचा तपशील, त्यांची मेडिकल हिस्ट्री, नजीकच्या काळात झालेला प्रवास, चालू असलेले उपचार व त्याचा तपशील आदी नोंदी प्रामुख्याने घेणार आहेत. ज्या नागरिकांना श्‍वसनाशी संबंधित आजार आहेत, याचीही नोंद केली जाणार आहे. ही माहिती तातडीने आरोग्य विभागाला देण्यात येणार आहे. त्यानंतर आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

No comments