Header Ads

प्रतापसिंह हायस्कूल रयत शिक्षण संस्थेकडे वर्ग करण्याच्या निर्णयाची चौकशी व्हावी; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी satara

सातारा : सातारा जिल्हा परिषद प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवली असती तर प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आवश्यक असलेल्या सोयी, सुविधा आणि सुधारणा करणे शक्य होते परंतु प्रशासनाने हे हायस्कूल रयत शिक्षण संस्थेकडे वर्ग करुन स्वतःच्याच शिक्षकांच्या गुणवत्तेबद्दल शंका घेतली आहे. त्यामुळे हे हायस्कूल रयत शिक्षण संस्थेकडेच का वर्ग केले आणि का केले या जिल्हा परिषद प्रशासनाच्या निर्णयाची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवेदनाव्दारे विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यांनी ई मेलव्दारे निवेदन पाठवले आहे.

निवेदनात, प्रतापसिंह हायस्कूल रयत शिक्षण संस्थेकडे वर्ग करुन जिल्हा परिषद प्रशासनाने सातारा जिल्हा परिषदेतील तमाम शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत शंका घेतली आहे. याच प्रतापसिंह हायस्कूलमधून महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणाची भरारी घेऊन शाळेचे नाव साता समुद्रापार जागतिक स्तरावर नेले. अनेक नामवंत विद्यार्थीही याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेत. त्यावेळी जिल्हा परिषद शिक्षकच ज्ञानदानाचे काम करीत होते मग आत्ताच या शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाला शंका का यावी. आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा, रयत शिक्षण संस्थेने गुरुकुल पॅटर्न राबवत शैक्षणिक प्रकल्प राबवत आहे. त्याच धर्तीवर शासनाने जि.प. च्या शिक्षकांना सुविधा पुरवाव्यात, त्यांच्यावर प्रशासनाने विश्वास दाखवावा, तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावेत, जिल्हा परिषदेचे सीईओ आयएएस असतात, उपमुख्यकार्यकारी राज्यसेवा परीक्षामधून आलेले आहेत. जि.प. च्या आठही खातेप्रमुख राज्यसेवा परीक्षेला सामोरे गेलेले असतात. एवढे मेरीट जि.प. कडे असताना कोणताही शैक्षणिक प्रकल्प चुटकीसरशी राबू शकतो फक्त इच्छाशक्ती पाहिजे त्याचाच अभाव असल्याने आपली जबाबदारी गुणवत्तेच्या नावाखाली रयतकडे सोपवून मोकळे होतानाच जि.प.प्रशासनाने आपल्याच शिक्षकांची इज्जतीचे वाभाडे काढल्याची भावना सातारकरांची आहे. त्यामुळे प्रशासनाचा प्रतापसिंह हायस्कूलकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक नव्हताच असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ई मेलव्दारे पाठवण्यात आल्या आहेत.

No comments