Header Ads

बोगद्याच्या घाटात पडतायत कोंबड्यांची पिसे; सातारकरांचे आरोग्य धोक्यात satara

सातारा : सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. सातारा येथील बोगद्याच्या बाहेर घाटात चिकन विक्रेत्यांनी टाकलेली कोंबड्यांची पिसे आणि इतर अवशेष रोगराईला निमंत्रण देत आहे. या घाणीमुळे सातारकरांचे आरोग्य धोक्यात आले असून, घाण टाकणारांवर कारवाई करण्याबाबत प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.

ऐतिहासिक सातारा शहराला सध्या कोरोना महामारीने ग्रासले आहे. एकीकडे कोरोनाशी झुंज सुरु असतानाच काही बेजबाबदार लोकांकडून उघड्यावर कचरा, घाण टाकून रोगराईला निमंत्रण देण्याचे प्रकार सुरु आहेत. सातारा शहराच्या दक्षिणेला समर्थ मंदिरच्या पुढे ऐतिहासिक बोगदा आहे. या बोगद्यातून शेंद्रे आणि सज्जनगड असे दोन रस्ते जातात. शेंद्रे रस्त्याला सातारा नगर पालिकेचा अधिकृत सोनगाव कचरा डेपो आहे. याठिकाणी संपूर्ण सातारा शहरातील कचरा टाकला जातो. मात्र याच्याच विरुद्ध बाजूला बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर सज्जनगड जाणाऱ्या रस्त्यावर पहिल्याच वळणाच्या दरीत मृत कोंबड्यांचे अवशेष, पिसे, इतर कचरा, बाटल्या  टाकण्यात आल्या आहेत. दररोज याठिकाणी हि घाण टाकली जात असून आता पिसांचा मनोरा उभा होत आहे. हि घाण समर्थ मंदिर व आसपासच्या चिकन विक्रेत्यांकडून टाकली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणजे आहे. या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. प्रशासनाने या घाणीची त्वरित विल्हेवाट लावावी आणि यापुढे याठिकाणी घाण पडू नये यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि सातारकर नागरिक करत आहेत.

No comments