Header Ads

..अखेर कऱ्हाडकर यांनी ठराव मंजूर करून घेतले; पाचगणी पालिकेत आ. मकरंद पाटलांच्या गटाला दणका mahab

पाचगणी : आ. मकरंद पाटील यांनी जमवाजमव करून एकत्रित आणलेल्या १३ जणांच्या गटाचे तीन तेरा वाजले आहेत. लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे पारडे पुन्हा एकदा जड झाले आहे. आज झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत त्याची प्रचिती आली. पालिकेच्या सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वसाधारण सभा पार पडली. अगोदर विविध विषयांपैकी प्रत्येक विषयावर बहुमतात असलेले विरोधक प्रत्येकवेळी नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत होते. आजही तसाच प्रकार घडण्याची अपेक्षा होती. पूर्वी नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांच्याकडे ४ आणि विरोधात १३ नगरसेवक होते. परंतु आज विरोधातील ४ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने समसमान मते पडली. शेवटी कास्टिंग मतांच्या जोरावर कऱ्हाडकर यांनी ठराव मंजूर करून घेतले. यावरून लक्ष्मी कऱ्हाडकर यांचा चाणाक्षपणा दिसून आला. मोठा गाजावाजा करीत आमदार मकरंद पाटील यांनी केलेली जुळवाजुळव अखेर आज फुटल्याचे समोर आले.

आज झालेल्या सभेत १५ विषयांवर चर्चा झाली. नगरपालिका मालकीच्या टाऊन हॉलचे अतिवृष्टीमध्ये नुकसान झाल्याने त्याची दुरुस्ती करण्याबाबत विचार करण्याच्या विषयावर जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी हा विषय लावून धरला. परंतु हा ठराव अध्यक्षांनी मतदानावर टाकला. कऱ्हाडकर यांच्या बाजूने विरोधातील  विनोद बिरामणे, अनिल वन्ने, पृथ्वीराज कासुर्डे, रेखा कांबळे या चौघांनी मतदान केल्याने समसमान मते पडली. त्यामुळे अध्यक्षांनी कास्टिंग मतांच्या जोरावर हा ठराव मंजूर करून घेतला. त्याचबरोबर मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, नगरपरिषद प्रवासी कर विभागाच्या प्रवासी वसुलीबाबत प्राप्त झालेल्या कार्यालयीन अहवालावर विचार करून निर्णय घेणे, नगरपालिका कार्यालयांमधील विविध विभागांमध्ये मुदतीत प्राप्त झालेल्या निविदांचा विचार करणे, नगरपालिकेचे सावंत भाजी मार्केट व इतर ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक दुरुस्ती करण्याबाबत विचार करून निर्णय घेणे. नैसर्गिक आपत्तीमुळे भाजी मंडई येथे पडलेल्या झाडांमुळे पालिकेच्या मालकीच्या भाजीवाले बाजार रोडचे अँगल तसेच पत्र्याचे नुकसान झाले आहे, त्याची दुरुस्तीबाबत विचार करणे, नगरपरिषद मालकीच्या मटण मार्केटमध्ये दुकान गाळा भाड्याने रक्कम परत मिळणेबाबत आलेल्या अर्जाचा विचार करून निर्णय घेणे, पालिका हद्दीतील धोकादायक झाडांची खडसनी करण्याबाबत निर्णय घेणे. जेनी स्मिथ वेल्फेअर यांना दिलेल्या मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण करणे तसेच कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या कामाचा ठेका संपल्याने त्यावर निर्णय घेणे, शांतीनगर अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे तसेच कोविड-19 अंतर्गत पालिकेतर्फे केलेल्या निर्जंतुकीकरण आणि उपाय योजनांवर कार्योत्तर खर्चास मान्यता देणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली. हे सर्व विषय नगराध्यांनी कास्टिंग व्होटवर मंजूर करून घेतले. या सभेस सर्व नगरसेवकांबरोबरच नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी गिरीश दापकेकर उपस्थित होते.

No comments