Header Ads

शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला; शरयू कारखान्यावर रयत क्रांतीचे आंदोलन satara

सातारा : एफ.आर. पी.चा कायदा पायदळी तुडवत शेतकऱ्यांच्या उसाचे बिल थकवणाऱ्या शरयू कारखाना (ता.फ लटण) कारखान्यावर रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर मंगळवारी बैठक आयोजित करून मार्ग काढण्याचे आश्वासन कारखान्याच्या वतीने देण्यात आले, अशी माहिती रयत क्रांतीचे मधुकर जाधव यांनी दिली.

कारखान्याला ऊस पाठविल्यानंतर चौदा दिवसात शेतकऱ्यांना बिल अदा करायचा  एफ.आर. पी.चा कायदा असताना तो पायदळी तुडविण्याचा प्रकार शरयू कारखान्याने केला. तब्बल चार पेक्षा अधिक महिन्याचा कालावधी उलटुन ही शेतकऱ्यांना कारखान्याने अद्याप बिले दिली नाहीत. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी संयमाची भूमिका घेतली. मात्र, अन् लॉक होवून महिना उलटुन ही कारखाना कोणतीच पाऊले उचलत नसल्याने सोमवारी शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. अन् थेट सर्वांनी कारखान्यावर एकत्र येत घोषणाबाजी केली. त्यावेळी कारखान्यावर कार्यकारी संचालक, शेती अधिकारी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले. मात्र, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत मंगळवारी बैठक आयोजित करण्याचा तोडगा काढला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांचे सर्व पैसे अदा न झाल्यास कारखान्याला टाळे ठोकण्याचा इशारा मधुकर जाधव व रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

No comments