Header Ads

परप्रांतीयांच्या जाण्याने भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध; स्थानिक बेरोजगारांनी संधीचे सोने करण्याचे आ. शिवेंद्रराजेंचे आवाहन satara

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु असून महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूर आणि कामगार त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. सध्यस्थितीला प्रशासनाने औद्योगिक कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली असून सातारा एमआयडीसीतील कंपन्या सुरु झाल्या आहेत. परप्रांतीयांच्या जाण्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्द्ध झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी या संधीचे सोने करून  विविध कंपन्यांमध्ये आपल्या शैक्षणिक अहर्तेनुसार नोकरी मिळवावी आणि बेरोजगारीला आळा घालावा, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

रोजगार उपलब्ध नाही, नोकरी मिळत नाही. परप्रांतीयांमुळे एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी नाही. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबईवर अवलंबून रहावे लागते, असे आपण नेहमीच ऐकत असतो. आज परिस्थिती वेगळी आहे. कोरोना महामारीमुळे देशभरात लॉक डाऊन सुरु आहे. लॉक डाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जे ते आपापल्या राज्यात, घरी परत जात आहेत. साताऱ्यातूनही हजारो परप्रांतीय त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. त्यामुळे सातारा एमआयडिसीतील विविध कंपन्यांमध्ये टर्नर, फिटर, हेल्पर, मशीन ऑपरेटर, गवंडी, सुतार अशा अनेक पदांच्याअसंख्य जागा रिक्त झाल्या आहेत. विविध ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये वाहन चालकांची असंख्य पदे रिक्त झालेली आहेत. कोरोनासारखी महाभयंकर साथ ही वाईट आहेच पण, यामुळे का होईना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. ही चालून आलेली संधी स्थानिक भूमिपुत्रांनी कॅच केली पाहिजे. सातारा एमआयडीसीमध्ये विविध कंपन्या असून या कंपन्या आता सुरु झाल्या आहेत. परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात परत गेल्याने सर्वच कंपन्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. या रिक्त जागेवर नोकरीची संधी स्थानिकांसाठी चालून आली आहे. त्यामुळे या  संधीचे सोने करणे आणि बेरोजगारीला आळा घालणे यासाठी  तरुणांनी सर्वोतोपरी प्राधान्य दिले पाहिजे. स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळत नाही, बेरोजगारी वाढली असे म्हणण्यापेक्षा आता बेरोजगारी संपुष्टात आणण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांनी, कामगारांनी एमआयडीसीमध्ये उपलब्ध नोकरीच्या संधी शोधून त्या मिळवल्या पाहिजेत. कंपन्यांनाही कामगारांची गरज आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संधीचा फायदा घ्यावा आणि स्थानिक बेरोजगारीला आळा घालण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलावे, असे  आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

No comments