Header Ads

माउलींचे अभ्यंग स्नान, चांदोबाचा लिंब येथील पालखी सोहळ्याच्या पहिल्या उभ्या रिंगणासह जिल्ह्यातील वारकरी पायी दिंडीला मुकणार satara

सातारा : लाखो वारकर्‍यांचे आराध्य दैवत असणार्‍या संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळाही आता कोरोनामुळे रद्द करण्याची वेळ आली असून सातारा जिल्ह्यात यंदा पालखी सोहळाच नसल्याने जिल्ह्यातील वारकरी या सर्वात मोठ्या सोहळ्याला मुकणार आहेत. तसेच नीरा नदीमध्ये माउलींचा स्नान सोहळा देखील यावर्षी वारकर्‍याना याची देही याची डोळा पाहता येणार नाही. जिल्ह्यात दरवर्षी पालखी सोहळ्याचे चार मुक्‍काम होतात, परंतु यावर्षी सोहळाच रद्द झाल्याने वारकर्‍यांना घरूनच विठ्ठलाचं दर्शन घ्यावे लागणार आहे.

 जून महिना जवळ आल्याने कोरोनामध्ये संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा निघणार की नाही, यावर राज्य सरकार आणि चोपदारांसमवेत बरीच चर्चा झाली. चोपदारांनी यावर अनेक पर्याय सुचवले होते. मात्र, संसर्ग टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अखेर सोहळा रद्द करण्यात आला. यावर पर्याय म्हणून ३० जून रोजी हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाने माऊलींच्या पादुका थेट पंढरपुरात नेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पुण्यातील आळंदी येथून दरवर्षी संत ज्ञानेश्‍वरांच्या पादुका घेऊन पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतो.

पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर निरा नदी येथील दत्त घाटावर पादुकांना अभ्यंग स्नान घालण्यात येते. त्यानंतर सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे पालखी सोहळ्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात येते. त्यानंतर वाजत गाजत पालखी सोहळा लोणंद येथे मुक्‍कामी येतो. दुसर्‍या दिवशी सकाळी विधीवत पूजा अर्चा झाल्यानंतर दुपारी 1 च्या सुमारसास पालखी सोहळा तरडगावकडे मार्गस्थ होतो. चांदोबाचा लिंब येथे पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण सोहळा संपन्‍न होतो. त्यानंतर तरडगाव येथे मुक्‍कामी असते. त्यानंतर पालखी सोहळा सकाळी काळज, ता. फलटण येथे रवाना होतो. सकाळी 9.30 वाजता काळज येथील दत्तमंदिरात न्याहरी असते. त्यानंतर सुरवडी  येथे विसावा, निंबोरे येथे दुपारचे भोजन, वडजल येथे विसावा त्यानंतर फलटण येथे स्वागत व मुक्‍काम होतो. फलटणहून विडणीकडे पालखी सोहळा मार्गस्थ होतो. विडणी येथे सकाळी 9.30 वाजता न्याहरी असते. त्यानंतर पिंप्रद येथे दुपारचे भोजन व विसावा असतो. त्यानंतर वाजेगाव मार्गे बरड येथे पालखी सोहळा मुक्‍कामी असते. बरड हा सातारा जिल्ह्यातील पालखी सोहळ्याचा मुक्‍काम असतो. बरडहून सोहळा सकाळी निघाल्यानंतर राजूरी येथे न्याहरीसाठी विसावतो. त्यानंतर सातारा जिल्ह्याच्यावतीने निरोप देवून सोहळा सोलापूर हद्दीत प्रवेश करतो.

मुक्‍कामाच्या कालावधीत जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण असते. सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासन दिवस रात्र राबत असते. निरा नदीत पादुकांचे स्नानावेळी सातारा व पुणे जिल्ह्यातील भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी गर्दी करत असतात. चार दिवसांच्या मुक्‍कामामध्ये जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविका पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. रात्रंदिवस पालखी तळावर पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागत असतात. या पूर्ण कालावधीत हरिनामाचा जप सुरू असतो. कोरोनामुळे यंदाचा पालखी सोहळा रद्द  करण्यात आला आहे. यापूर्वीही 1920 व 1945 या वर्षी पालखी सोहळा निघाला नव्हता. तर तुकाराम महाराजांच्या आठव्या वंशजांच्या काळात एके वर्षी पायी दिंडी रद्द करावा लागल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे यंदा वारकरी भाविकांना संतांनी विठ्ठलाचं रुप सगुण आणि निर्गुण स्वरुपात पहावे लागणार आहे.

No comments