Header Ads

मुख्य बाजारपेठ वगळून सातारा सुरु satara

सातारा : जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडलेली ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे (मायक्रो कंटेनमेंट झोन) म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहेत. त्यामुळे बाजारपेठा, शॉपिंग मॉल, व्यापारी संकुले याठिकाणी असलेली भाजीपाला व फळे दुकाने, दूध विक्री केंद्र, किराणा दुकाने, औषध दुकाने वगळता उर्वरित दुकाने बंद राहतील. प्रशासनाकडून मज्जाव करण्यात  परिसर सोडून उर्वरित परिसरातील काही दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एकत्रित दुकाने असलेल्या ठिकाणी संभाव्य गर्दी विचारात घेवून तेथील दुकानांसाठी वेगळी नियमावली निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्याची झोननिहाय पाच प्रकारांत विभागाणी केली आहे.  सातारा शहर, कराड शहर, ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडलेली गावे किंवा वस्त्या (मायक्रो कंटेनमेंट झोन), ग्रामीण व शहरी भागात कोरोना रुग्ण नसलेले भाग (नॉन  मायक्रो कंटेनमेंट झोन) असे प्रकार करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग  रोखण्यासाठी विभागानुसार परिस्थिती विचारात घेवून प्रशासनाने काही उपाययोजना सुचवल्या आहेत. लोकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काही दुकानांना अटी-शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठ, शॉपिंग सेंटर, व्यापारी संकूल याठिकाणची केवळ अत्यावश्यक सेवेत असलेली दुकानेच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.उर्वरित दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. ही दुकाने सुरू राहणार आहेत त्यासाठी  सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुकाने सुरु ठेवत असताना ग्राहकांची गर्दी टाळण्याची जबाबदारी ही संबंधित दुकानदारांची आहे. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर (फिजिकल डिस्टन्स) न राखल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. तोंडावर मास्क लावणे आवश्यक असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड वसूल केला जाणार आहे.

सातारा शहरात नगरपालिका मालकीची असलेली सुमारे 12 व्यापारी संकुले बंद राहणार आहेत. मात्र त्याठिकाणी असलेल्या अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरु ठेवण्याला परवानगी आहे. सातारा शहरात गर्दी टाळण्यासाठी राजपथ, राधिका रोड, कर्मवीर पथावरील अत्यावश्यक सेवांमधील दुकाने वगळता उर्वरित दुकाने बंद ठेवण्याचा विचार प्रशासन करत आहे. सदाशिव पेठ व मोती चौक पसिरात राहत्या घरामध्ये असलेली दुकाने गर्दीमुळे बंद ठेवावी लागणार आहेत. सातारा शहरातील मुख्य बाजारपेठ वगळून स्वतंत्र व एकटी असलेल्या सर्व दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत आणखी चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सातारा शहरात कोरोना रुग्ण सापडलेली कोडोलीसह 6 ठिकाणे सूक्ष्म प्रभावित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली असून त्याठिकाणी अत्यावश्यक सेवा दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये घरपोच भाजीपाला, दूध, किराणा, औषधे यांचा समावेश आहे. त्यासाठी सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी  30 किराणा सहित्य विक्रेते, प्रत्येकी 28 आषधे, फळे व भाजीपाला विक्रेते, 27 दूध विक्रेते यांचा समावेश आहे. संबंधित विक्रेत्यांना बाधित क्षेत्रात जाताना नियमांचे पालन बंधनकारक आहे.

सातार्‍यात कोणती दुकाने सुरू राहणार

सातारा शहर व उपनगरांमध्ये स्वतंत्र, एकटी असलेली सर्व दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामध्ये किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र, भाजी व फळ विक्री दुकाने, मेडिकल, मसाला दुकाने, पशुखाद्य, पेपर विक्री स्टॉल, सर्व दवाखाने, पेट्रोल पंप, पिठाची गिरणी,  सोने-चांदी दुकाने, इलेक्ट्रिक दुकाने, बांधकाम साहित्य दुकाने, वाहनांची शोरूम, गृहोपयोगी वस्तू, मटण व अंडी विक्री, घड्याळ दुकाने, वखारी, कपडे दुकान, मिठाई दुकान, स्टेशनरी दुकाने, चप्पल दुकाने, मोबाईल शॉपी व रिचार्ज, सौंदर्यप्रसाधने, हार्डवेअर दुकाने, कृषी औषध व साहित्य विक्री दुकाने, ऑटोमोबाईल, कृषी अवजारे व ट्रॅक्टर दुरुस्ती, गॅरेज, खाद्य तेलाचे घाणे, वाहनांची टायर विक्री व पंक्चर दुकाने, बेकरी उद्योग, बँका. 

सातार्‍यात कोणती दुकाने राहणार बंद

सातारा  शहरातील  व्यापारी संकुले, सर्व भाजी मंडई,  हॉटेल व रेस्टारंट, सिनेमा थिएटर, मॉल, जीम, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, मार्केट, सलून व ब्युटी पार्लर, सर्व प्रकारची दारू दुकाने,  कॉम्प्लेक्स बंद राहतील. याशिवाय सामाजिक व धार्मिक कार्यक्रम, एसटी बससेवा, रिक्षा, टॅक्सी बंद राहणार आहे. शाळा व महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी नाही.

मुख्य बाजारपेठेत फक्त अत्यावश्यक सेवा 

सातार्‍यातील राजपथ व कर्मवीर पथ  या रस्त्यालगत असणार्‍या बाजारपेठेतील तसेच पोवईनाका, मोती चौक, क्रीडा संकुल, राधिका रोडवरील दुतर्फा बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेच (मेडिकल, किराणा, दूध, फळे, भाजीपाला, पेट्रोपपंप) सुरू राहणार आहेत. या परिसरात उर्वरित दुकानांवर निर्बंध कायम असणार आहेत. 

No comments