Header Ads

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे ही सर्वस्वी नागरिकांचीच जबाबदारी; विनाकारण बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आ. शिवेंद्रराजेंचे आवाहन satara

सातारा : जिल्हा प्रशासनाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणची किराणा दुकाने सुरु केली आहेत. असे असले तरी कोरोनाचे संकट अद्यापही दूर झालेले नाही ते अजूनही आहे याचे भान नागरिकांनी ठेवावे. स्वतःची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेपुरतेच घराबाहेर पडावे, विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हि सर्वस्वी नागरिकांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या मोकळीकीचा कोणीही दुरुपयोग न करता गरजेपुरते घरातून बाहेर पडावे. गर्दी न करता वस्तू खरेदी करून तात्काळ घरी जावे आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जनतेला केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या आठ- दहा दिवसापासून सातारा शहर आणि आसपासच्या गावांमध्ये पूर्णतः लॉक डाऊन करण्यात आला होता. सर्वकाही बंद असल्यामुळे आणि होम डिलिव्हरी या मर्यादित पर्यायामुळे नागरिकांना किराणामाल, भाजीपाला, दूध या जीवनावश्यक वस्तू मिळणे अवघड झाले होते. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कंटेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणीची किराणा मालाची दुकाने तत्काळ सुरु करण्याची मागणी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती . त्यांच्या मागणीनुसार प्रशासनाने आजपासून कंटेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणी किराणा माल दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. हि बाब नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी खूप महत्वाची आहे. मात्र प्रशासनाने दिलेल्या मोकळीकीचा कोणीही दुरुपयोग न करता कोरोनाला आळा घालण्यासाठी स्वतःची जबाबदारी ओळखून वागावे. जागरूख राहावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांना केले आहे. प्रशासनाने कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी किराणा माल दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे, अशा ठिकाणी नागरिकांनी गर्दी होवू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. तसेच मास्क घालणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर किंवा साबणाने हात धुणे आणि वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आपले आरोग्य आपल्याच हातात आहे. कोरोना महामारीने संपूर्ण जग धोक्यात आले आहे. यामध्ये आपला देश, राज्य आणि आपला सातारा ही धोक्यात आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. त्यामुळे उगाच गर्दी करू नका. कोरोनापासून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण होण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जनतेला केले आहे. 

No comments