Header Ads

कराडच्या पत्रकार बांधवांसाठी सातारा धावला satara

सातारा : कोरोनाचे सर्वाधिक संकट सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात आहे. कराड तालुक्यातील पत्रकार बांधव या  भीषण संकटात अत्यावश्यक सेवा बजावत असताना लॉकडाऊनच्या काळात त्यांना मदत व्हावी या प्रामाणिक हेतूने सातारा जिल्हा पत्रकार संघामार्फत कराड शहर व तालुक्यातील पत्रकारांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोच करण्यात आली. संकट काळात कराडच्या पत्रकार बांधवांसाठी सातारा धावला, अशी प्रतिक्रिया कराडकरांनी व्यक्त केली आहे.

सातारा जिल्हा पत्रकार संघामार्फत सध्या संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे वाटप सुरु आहे. सातारच्या कूपर उद्योग समूहाने जिल्हा पत्रकार संघाच्या हाकेला ‘ओ’ देवून जीवनावश्यक वस्तूंची 100 किटस् दिली. कूपर उद्योग समूहाचे फरोख कूपर, मनिषा कूपर यांनी ही किटस् जिल्हा पत्रकार संघाच्या ताब्यात दिली. तर खंडाळा एमआयडीसीतील कंपनीने 40 किटस् दिली. ही 140 किटस् सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे राहुल तपासे, तुषार तपासे, ओंकार कदम, विठ्ठल हेंद्रे यांनी कराड येथे जावून सातारा जिल्हा पत्रकार संघाचे कराड येथील सदस्य प्रा. अशोक चव्हाण, गोरख तावरे, शशिकांत पाटील यांच्या ताब्यात दिली. यावेळी सतीश मोरे, अमोल चव्हाण, देवदास मुळे, चंद्रजित पाटील, अशोक मोहने, आनंदा थोरात, हैबत आडके हेही उपस्थित होते.

कराड शहर, तालुक्यातील पत्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना या मदतीचे सुयोग्य नियोजन करुन वाटप करावे, असे आवाहन यावेळी जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थितांना केले. त्यानुसार या मदतीचे वाटप दोन दिवसांत केले जाईल, अशी माहिती उपस्थित कराडमधील पदाधिकार्‍यांनी दिली आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाने योग्यवेळी सरसकट पत्रकारांना केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.

दरम्यान, सातारा जिल्हा पत्रकार संघाने संपूर्ण जिल्ह्यात केलेल्या पत्रकारांच्या मदत वाटपाच्या या उपक्रमाचे खा. श्रीनिवास पाटील यांनीही कौतुक केले. सातारा जिल्ह्यात पत्रकारांना आणखी कुठे मदत लागणार असेल तर मला ही अवश्य सांगा, असेही खा. श्रीनिवास पाटील यांनी फोन करुन पाटणे यांना सांगितले.

No comments