Header Ads

सातारा शहर बाजारपेठेतील इतर दुकाने तातडीने सुरु करण्याची आ. शिवेंद्रराजेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी satara

सातारा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले दोन महिन्यांपासून सातारा शहरातील मुख्य बाजारपेठ बंद आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, भाजीपाला, दूध विक्री दुकाने वगळता कापड दुकाने, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर, मोबाईल, कटलरी आदी इतर सर्वप्रकारची दुकाने बंद आहेत. वास्तविक सातारा शहरात कोरोना बाधित हे बाहेरून आलेले आहेत. नागरिकांची दैनंदिन गरज ओळखून सातारा शहर बाजारपेठेतील इतर दुकाने सुरु करणे आवश्यक असून तशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि मुख्य सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित , विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणविस आणि राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता याना ईमेल द्वारे निवेदन पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सातारा शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने गेले दोन महिन्यांपासून बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. किराणा माल, भाजीपाला, दूध आणि मेडीकल वगळता कापड दुकाने, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर, मोबाईल, कटलरी आदी इतर सर्वप्रकारची दुकाने बंद आहेत. वास्तविक सातारा शहरात स्थानिक रुग्णांची संख्या नगण्य असून जिल्ह्याबाहेरुन आलेले रुग्ण आणि विशेषकरुन पुणे येथून सातारा जिल्हा कारागृहात आलेले ९ कैदी हे कोरोनाबाधीत आहेत.


सातारा शहर हे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे ठिकाण असून शहरात एकमेव मुख्य बाजारपेठ आहे. सद्यपरिस्थिती पाहता कोरोना साथीचा सामना करत जीवन जगण्याचे धैर्य आता नागरिकांमध्ये आले असून प्रत्येकजण मास्क आणि सॅनिटयझरचा वापर करत आहे तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळत आहेत. कोरोनाचा सामना करतच दैनंदिन व्यवहार सुरळीत होणे आवश्यक असल्याने सातारा शहरातील बाजारपेठेतील इतर दुकानेही सुरु करणे आवश्यक आहे. दुकानदार आणि व्यावसायिकांना दिलासा देण्याबरोबरच नागिरकांनाही कपडे, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी व दुरुस्ती करणे, मोबाईल खरेदी, दुरुस्ती तसेच रिचार्ज करणे, हार्डवेअर, कटलरी यासह अन्य प्रकारच्या दुकानातील सामान हे दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. गेले दोन महिन्यांपासून ही दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे सातारा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता बाजारपेठ सुरु करण्यास कोणतीही हरकत नाही. शहरातील बाजारपेठ हि दोन रस्त्यांवर असून मोठ्या शहरांप्रमाणे विखुरलेली नाही. तसेच दुकाने सर्रास न उघडता प्रत्येक व्यवसायासाठी दिवस ठरवून द्यावा तसेच ठरावीक वेळ नेमून द्यावी आणि कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक निर्बंध आणि अटींवर ही सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देवून रोढावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सातारा शहरातील दुकाने सुरु करण्यासाठी तातडीने सातारा जिल्हा प्रशासनाला आदेश द्यावेत आणि नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. 

No comments