Header Ads

लोणंद येथील डाळिंबाच्या ९०० झाडांची बाग जळून खाक khandala

लोणंद : लोणंद येथील बागायतदार गणपतराव क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांपासून कष्टाने उभ्या केलेल्या तीन एकर डाळिबांची बाग जळून खाक झाली आहे. चार दिवसांनंतरही गणपतराव क्षीरसागर यांच्या डोळ्यापुढे आपली डाळिबांची बाग येताच अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दर नसल्याने डबघाईला आलेल्या शेतकऱ्याच्या मागील संकट काही कमी होताना दिसत नाही. कोरोनामुळे शेतकऱ्यावर मोठे संकटच उभे राहिले आहे. शेतमालाला भाव नसताना शेतकरी मोठ्या हिमतीने शेतीमध्ये नवनवे प्रयोग करताना दिसत आहे. मात्र, त्याला निसर्गाची व शासनाची साथ मिळताना दिसत नाही. त्यातच तेल्या व मर यासारख्या रोगांनी परिसरातील डाळिंब बागा ग्रासल्या आहेत.

या संकटांमुळे शेतकाऱ्यांनी डाळिंब बागा उपटून टाकल्या आहेत. मात्र, हार न मानता क्षीरसागर कुटुंबाने मोठ्या कष्टाने डाळिंबाची बाग उभी केली. कमी पाण्यावर व महागडी औषेधांची फवारणी करून फळाला आलेल्या बागेसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले होते. संपूर्ण बागेतील ९०० झाडांना ठिबक सिंचनची सोय केली होती. मोठ्या डौलाने उभी राहिलेल्या या बागेला मात्र दि. २६ रोजी रात्री अचानक आग लागली. आग कशी लागली का कोणी लावली, याचे कारण जरी समजू शकले नाही. तरी एका रात्रीत या डाळिबांच्या बागेची राख होताना पाहण्याचे दुर्भाग्य या कुटुंबावर आले. यामध्ये संपूर्ण ड्रीपच्या पाईप जळून खाक झाल्या मोठ्या कष्टाने उभी केलेली डाळिंबाची बाग काही क्षणात जळून खाक झाल्याने क्षीरसागर कुटुंबीयांचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. बागेचा पंचनामा संबंधित विभागाने केला आहे. तरी लवकरात लवकर या कुटुंबास नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी क्षीरसागर कुटुंबीय करीत आहेत.

No comments