Header Ads

विखळेत कारमधून अवैद्य दारू वाहतूक; दोघांना अटक : साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त crime

मायणी : विखळे येथील चौकातून कारमधून विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मायणी पोलिसांनी कारवाई केली. गाडीसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली. मायणी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी ही मोठी कारवाई केली आहे. याबाबत माहिती अशी की, विखळे येथील कातरखटाव-कलेढोण मार्गावरून कार (एमएच ०४ केके १०५३) मधून विनापरवाना विदेशी दारूची चोरटी वाहतूक होणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस नाईक बाबूराव खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण सानप, योगेश सूर्यवंशी, प्रकाश कोळी यांनी विखळे चौकात सापळा रचला.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास संबंधित गाडी आली. त्या गाडीची तपासणी केली असता कारमध्ये विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. त्यावेळी कारचालक व आत बसलेल्या व्यक्तीस खोक्यात काय आहे, असे विचारताच त्यांनी विदेशी दारूच्या बाटल्या आहेत, असे सांगितले. त्यावर त्यांना दारू वाहतूक व विक्रीचा परवानाबाबत विचारले, यावेळी त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. उद्धव किसन गायकवाड (वय ३७), विक्रम भीमराव गायकवाड (२५, दोघे रा. चिंचाळे ता. आटपाडी जि. सांगली) यांना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख रुपये किमतीची एक राखाडी रंगाची कार व आठ खोक्यांमध्ये ठेवलेल्या दारूच्या बाटल्या असा एकूण ६ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दोन दिवसांपूर्वी कारवाई करून ४ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या दिवशी लगेच ही अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून ६ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

No comments