Header Ads

वाई येथील रविवार पेठेत दोन गटातील किरकोळ वादातून गोळीबार; एक जण गंभीर crime

वाई : येथील एमआयडीसी रस्त्याला ढगे आळी भागात कल्पतरू मंगल कार्यालयाकडून बंटी जाधव रा.भुईंज याने मोटारीतून युवकांसह येत अभिजीत लोखंडे याच्यासह घरासमोर बसलेल्या युवकावर गोळीबार केला. यावेळी झालेल्या झटापटीत अर्जुन उर्फ राणा यादव हातावर काठी मारल्याने बंटी जाधवच्या हातातील पिस्तूल खाली पडली. ती अर्जुनने घेऊन बंटी जाधव व त्याच्या मित्रांवर गोळीबार केला. यावेळी एक गोळी भैया मोरे याच्या छातीच्या खालील भागात घुसून तो गंभीर जखमी झाला. त्याला सुरवातीला सातारा येथे व नंतर पुण्याला दाखल केले आहे.

मागील चार-पाच दिवसांपासून रविवार पेठेतील सोन्या शिंदे व अभिजित लोखंडे त्यांच्यामध्ये व्हाट्सअप ग्रुपमध्ये पोस्ट वरून वादावादी झाली होती. या दोघांमधील जुने वादही होते. बुधवारी दुपारपासून यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. एकमेकाकडे बघून घेण्यापर्यंत त्याच्यात शाब्दिक चकमक झाली होती. बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान बंटी जाधव याने मित्रांसह येऊन अभिजित लोखंडे मित्रांसह बसलेला असताना येऊन गोळीबार केला. यात भैया मोरे जखमी झाल्यावर त्याला उचलून गाडीतून घेऊन गेले. सुरवातीला रुग्णालयात सातारा येथे व नंतर पुण्याला दाखल केले. रविवार पेठेत ढगे आळीत गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सपोनि आशीष कांबळे, उपनिरीक्षक राजेंद्र कदम संजय मोतेवार कर्मचार्यांसह दाखल झाले. ते चौकशी करत असताना पोलीस उपअधीक्षक अजित टिके, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते दाखल झाले. सुरवातीला कोणी कोणावर गोळीबार केला याची माहिती मिळत नव्हती. यानंतर या अनुषंगाने अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची माहिती उघडकीस आली. याप्रकरणी दिलीप बाजीराव मोरे, गंगापुरी वाई याने अभिजित लोखंडे, विजय अंकुशी, अर्जुन यादव, सुनील जाधव, नितीन भोसले यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. तर अर्जुन यादव याने अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, सोन्या शिंदे, अभिजित मोरे व इतर दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व सहायक निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील बुधवारी रात्री व गुरुवारी वाईत तळ ठोकून होते. याप्रकरणी पोलीसानी अभाजीत लोखंडे, अर्जुन उर्फ राणा यादव, विजय अंकुशी, नितीन भोसले, सुनील जाधव यांना अटक केली आहे. दुसऱ्या गटातील लोक फरार असून त्यांना शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.

No comments