Header Ads

कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील ६३ हजार शेतकऱ्यांना होणार लाभ; याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत होणार उपलब्ध : प्रकाश आष्टेकर satara

सातारा : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्राथमिक प्रमाणिकरणाचा प्रारंभ आज सातारा तालुक्यातील लिंब व फलटण तालुक्यातील गुणवरे येथे करण्यात आला. या दोन्ही गावातील ३६२ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ६३ हजार ७७६ शेतकत्यांना होणार असून अंतिम यादी २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी दिली. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील लिंब आणि फलटण तालुक्यातील गुणवरे येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करुन या योजनेचा शुभारंभ आज   जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्या हस्ते  यांच्या हस्ते लिंब येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या शुभारंभ प्रसंगी सातारच्या तहसीलदार आशा होळकर, महाराष्ट्र बँकेचे अंचल प्रबंधक वसंत गागरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, सहायक उपनिबंधक बाळासाहेब तावरे आदी उपस्थित होते.

लिंब व गुणवरे येथील ३६२ शेतकऱ्यांची प्राथमिक यादी आज पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दोन्ही गावातील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत सातारा तालुक्यातील लिंब व फलटण तालुक्यातील गुणवरे या गावांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून या दोन्ही गावातील ३६२ शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत एसएमएस पाठविण्यात आले आहेत. आधार प्रमाणीकरण नोंदविण्याचे काम आपले सरकार केंद्रावर व संबंधित बँक शाखेत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे आज आधार प्रमाणिकरण केले त्या शेतकऱ्यांना मोबाईलवर कर्जमाफीची कार्यवाही सुरु झाल्याचे एसएमएस येत आहे. या दोन्ही गावात आधार प्रमाणिकरणाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून महात्मा  जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील ६३ हजार ७७६ शेतकऱ्यांना होणार असून जवळपास ४४५ कोटी रुपये एवढी थकीत कर्जाची रक्कम आहे. शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी यावेळी सांगितले.

कर्जमुक्ती योजनेमुळे जीवनात आर्थिक परिर्वतन घडेल : प्रदिप मगर

विविध कार्यकारी सेवा सोसायटीमधून सन २०१८ मध्ये  कर्ज घेतले होते. काही करणास्तव मी हे पिक कर्ज फेडू शकलो नाही. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यादीत माझे नाव आहे. आज बँकेत येऊन आधार प्रमाणिकरण केले असता कर्जाची रक्कम खात्यावर जमा होण्याची कार्यवाही सुरु आहे, असा मला एसएमएस आला. कर्जमुक्तीमुळे माझ्या जीवनात नक्की आर्थिक परितर्वन घडेल असा विश्वास लिंब ता. सातारा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रदिप रघुनाथ मगर यांनी व्यक्त केला.

मी कर्जमुक्त होणार : शेतकरी  हणमंत सावंत

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे माझे १ लाख ६८ हजार  रूपयांचे कर्ज माफ होवून मी कर्जमुक्त होणार असल्याचे समाधान लिंब येथील शेतकरी हणमंत पांडूरंग सावंत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र बँकेच्या लिंब शाखेतून १ लाख ६८ हजार रुपयांचे पिक कर्ज घेतले होते. आज या बँकेत येऊन आधार प्रमाणीकरण केले. याची पावती मला बँकेने दिली. हे प्रमाणिकरण केल्यानंतर तात्काळ कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया सुरु असलेला एसएमएस आला. ही शासनाची खूप चांगली योजना असून या योजनेमुळे मी कर्जमुक्त होणार आहे.

No comments