Header Ads

मावळ्यांच्या गर्जनेने दुमदुणार किल्ले प्रतापगड; शिवजयंतीसाठी शाहूनगरी सज्ज satara

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीसाठी शाहूनगरी सज्ज झाली आहे. शिवजयंतीनिमित्त उद्या दि.१९ रोजी पालिकेच्या वतीने भव्य मिरवणूक, शोभायात्रा, पोवाडे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेनेही प्रतापगडावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे.

शाहूनगरीमध्ये शिवजयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या वर्षीही मोठ्या उत्साहाने पालिका व शिवजयंती मंडळांनी तयार केली आहे. अजिंक्‍यतारा किल्ला, राजवाडा, कमानी हौद, पोवई नाक्‍यावरील शिवरायांचा पुतळा, नगरपरिषद कार्यालय अशा ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी आकर्षक कमानी उभारण्यात येत आहेत. शिवजयंती मंडळांनी विविध प्रकारच्या देखाव्यांची तयारी केलेली आहे. त्याचबरोबर शाळा-शाळांमध्येही शिवजयंतीचे नियोजन करण्यात आले आहे. उद्या नगरपरिषद कार्यालयात सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर पोवई नाक्‍यावरील शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालिकेच्या वतीने अभिवादन केले जाणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता गांधी मैदानावर शिवशाहीर शिवम भूतकर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. साडेपाच वाजता गांधी मैदानावरून शिवजयंतीच्या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी शिवचरित्रातील प्रसंगावर आधारित चित्ररथ यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच पारंपरिक गजी नृत्य, झांजपथक, लेझीम पथक व हलगी वादक, घोडेस्वार मावळे यांची पथके. याशिवाय शिवाजी उदय मंडळाची पालखी हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण असणार आहे.

No comments