Header Ads

१३ ते १७ फेब्रुवारी रोजी साताऱ्यात मानिनी जत्रेचे आयोजन satara

सातारा : महिला स्वयंसहाय्यता समुहांना जास्तीत जास्त विक्री कौशल्य आत्मसात व्हावे यासाठी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानात दिनांक 13 ते 17 फेब्रुवारी 2020 रोजी मानिनी जत्रेचे आयोजन आले असून विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबूले व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन “मानिनी जत्रा” व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी आयोजीत केला जातो. सदर प्रदर्शनामध्ये महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादीत केलेल्या मालांची विक्री केली जाते.

यावर्षीची मानिनी जत्रा प्रदर्शन हे संपूर्ण प्लास्टीक मुक्त असणार असून या मानिनी जत्रेचे उद्घाटन विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते होणार आहे. राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराजे देसाई प्रमुख उपस्थितीत सर्व जिल्ह्याचे सर्व खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन उदघाटन सोहळा व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळयासाठी उपस्थित राहणा-या 1000 महिलांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. मानिनी जत्रेमध्ये ३३ राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार विजेत्या स्वयंसहाय्यता समुहांना तसेच बॅकर्स व पत्रकारांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.  मानिनी जत्रेसाठी शासनाकडुन रू.१० लाखाची तरतूद केली असुन नाबार्ड व आयडीबीआय बैंक,ओरीएंटल बँक ऑफ कॉमर्स, बँक ऑफ महाराष्ट्र,बैंक ऑफ इंडिया,आयसीआयसीआय बँक,युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडुन प्रायोजकत्व मिळणार आहे. यावर्षी मानिनी जत्रेचे आकर्षण हे लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क, विविध करमणुकीचे कार्यक्रम प्रथमच आतंरराष्ट्रीय दर्जाचे सुपरस्ट्रक्चर पिलरलेस मंडप व प्रिफॅब्रिकेटेड स्टॉल्स, तसेच स्वयंसहाय्यता समुहांसाठी आरक्षित असणा-या ८० स्टॉल्स व्यतिरीक्त ज्या योजनेकडील समुहांना मोफत स्वरूपामध्ये स्टॉल्स उपलब्ध होऊ  शकला नाही अशा आणखीन ४० स्वयंसहाय्यता समुहांना नाममात्र प्रतिदिन एक हजार रूपये या दराने स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ८० शासकीय स्टॉल व १०० खाजगी स्टॉल असे एकुण १८० स्टॉलची उभारणी करण्यात आलेली आहे. खाजगी स्टॉल हे संबंधित ठेकेदार यांनी लावायचे असून यामधून शासकीय स्टॉलची विक्री वाढण्यामध्ये मदत होणार आहे.

मानिनी जत्रेमध्ये ५० इतर व्यवसायांचे व ३० फुड स्टॉल असुन त्यामध्ये स्वयंसहाय्यता समुह हे हातसडीचे तांदुळ, इद्रायणी तांदुळ चिक्की, विविध मसाले, शुगर फ्री बिस्कीटे, सेंद्रीय हळद, लाकडी खेळणी, सेंद्रीय काकवी, गांडुळखत,स्ट्रॉबेरी, कुरडई, पापड, लोणची, गारमेंट, सॉफ्ट टॉईज, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ (कडधान्य विविध प्रकारचे), इमिटेशन ज्वेलरी नॉव्हेल्टीज, विविध प्रकारच्या चटण्या, सेंद्रीय गुळ, आवळा कैंडी याचबरोबर शाकाहारी जेवण, थालीपीठ, पुरणपोळी, मांसाहारी जेवणाचे मटण थाळी, चिकण थाळी, बिर्याणी, मच्छी व इ.स्टॉल सहभागी होणार आहेत.  ही जत्रा प्लास्टीक मुक्त असेल इको फ्रेंडली कटलरी व ग्लास समुहांना जिल्हा परिषदे मार्फत पुरविली जाणार आहे.मैदानाची स्वच्छता व धुळ मुक्त ठेवण्याचा पुरेपूर प्रयास करण्यात येणार आहे. “मानिनी जत्रा २०१९-२०” मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता समुहांचे एकुण ८० स्टॉल सहभागी असुन त्यामध्ये व ५० इतर व्यवसायाचे स्टाल  ठेवणेत आलेले आहेत. पुणे विभागातुन विविध व्यवसाय करणारे समुह सहभागी होणार आहेत.  “मानिनी जत्रा २०१९-२०” मध्ये ३० फुड स्टाल असुन त्यामध्ये स्वयंसहाय्यता समुह हे फुड स्टाल मध्ये लावणार आहेत. तरी खवैय्यांनी त्याचा लाभ घ्यावा. तरी सर्व सातारा जिल्हावासीयांनी लाभ घेऊन विक्रमी खरेदी करावी. तसेच मानिनी जत्रेमध्ये जास्तीत जास्त समुहांनी उत्पादीत केलेल्या माल घेऊन मानिनी जत्रेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

No comments