Header Ads

शिवज्योत घेऊनी किल्ले अजिंक्यतारा ते हरपळवाडी धावल्या शिवकन्या satara

सातारा : शिवजयंती निमित्त हरपळवाडी ता.कराड येथील शिवकन्यांनी साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा ते हरपळवाडी अशी शिवज्योत आणली. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून जोरदार स्वागत करण्यात आले. रेनबुकान कराटे असोसिएशन, महाराष्ट्र संचलित हरपळवाडी (ता.कराड) येथे श्री व्हेंचर कराटे क्लब गेल्या वर्षी सुरू झाला. यावर्षी या कराटे क्लबचा पहिला वर्धापनदिन नेमका शिवजयंती दिवशीच आला. त्यामुळे हा वर्धापनदिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा मानस या क्लबमधील बाल विद्यार्थ्यांनी शिक्षक अक्षय साळुंखे व रविना देशमुख यांच्याकडे व्यक्त केला.त्यांचा उत्साह पाहुन किल्ले अजिंक्यताराहून शिवज्योत आणण्याचे निश्चित झाले.

शिवजयंतीदिवशी पहाटे पाचच्या सुमारास किल्ले अजिंक्यताराहून क्लबच्या शिवकन्यांनी शिवज्योत  घेऊन धावण्यास सुरवात केली. ही शिवज्योत साईबाबा मंदिर (गोडोली), खिंडवाडी, शेंद्रे, भरतगाववाडी, बोरगाव, नागठाणे अतीत मार्गे हरपळवाडी येथे सकाळी १० वाजता पोहचली. संपूर्ण मार्गात क्लबच्या बाल शिवकन्या ज्योत घेऊन धावत होत्या. लहान विद्यार्थिनी ज्योत घेऊन धावत असल्याचे पाहून महामार्गावरील वाहचालकही त्यांचे कौतुक करत होते. त्यांच्या या उपक्रमास ठिकठिकाणी ग्रामस्थांनी प्रतिसादही दिला. हरपळवाडी येथे ज्योत पोहचल्यावर तेथील ग्रामस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या चिमुकल्यांचे उत्फुर्त स्वागत केले. या वेळी कराटे क्लबच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. या मोहिमेत सिद्धी पवार, अनुष्का गोरे, श्रुती काळभोर, सानिका शिंदे, सानिका जाधव, विद्या काळभोर, सरगम काळभोर, अमृता काळभोर, वैष्णवी पवार, सई पवार, अंजली चव्हाण, अक्षदा चव्हाण, पायल देशमुख या शिवकन्यांसह शुभम देशमुख व श्रेयस काळभोर हे बाल मावळेही सहभागी झाले होते.

No comments