Header Ads

रेल्वे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक satara

सातारा : रेल्वेमध्ये क्लार्क पदावर लावतो, असे सांगून लाखो रुपये घेतले. मात्र, नोकरी न लावता फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयित सातारा, पुणे, सांगली व लखनौ येथील आहेत. या घटनेत मोठी साखळी असण्याची शक्यता असून फसवणूक झालेल्यांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. जैनउद्दीन मोहम्मद मुजावर (रा.काशीळ ता. सातारा), अजित अर्जुन खंडागळे (रा. पुणे), विश्‍वजित माने (रा.आष्टा जि. सांगली), सौरभ त्रिपाठी (रा.लखनौ) या संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नीलेश विठ्ठल भणगे (वय 24, रा. आकोेशी ता. वाई) या युवकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार युवक नीलेश भणगे याने रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज भरला होता. नीलेशच्या मित्राने जैनुउद्दीन मुजावर या संशयित आरोपीबरोबर त्याची ओळख करून दिली व त्याची रेल्वे प्रशासनामध्ये वरपर्यंत ओळख असल्याचे सांगितले. नीलेश याच्याबरोबर त्याचे आणखी दोन मित्र मुजावर याला भेटले. संशयिताने रेल्वेमध्ये ओळख असल्याचे सांगून त्यांना नोकरी पाहिजे असल्यास प्रत्येकी दीड लाख रुपये  द्यावे लागतील असे सांगितले. जानेवारी 2019 पासून तक्रारदार व त्याच्या मित्रांनी संशयितांना  प्रत्येकी 3 लाख रुपये याप्रमाणे एकूण 9 लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर संशयितांनी तिघांना मेडिकल चेकअपसाठी बोलवले. तेथे मेडिकल चेक अप झाल्यानंतर जॉईनिंग लेटर देतो, असेही सांगितले. संशयितांनी जॉईनिंग लेटरही दिले. सुरुवातीला ट्रेनिंग होईल, असे सांगून रेल्वे स्टेशनवर बोलवले. मात्र, कार्यालयीन काम न देता रेल्वे प्लॅटफॉर्मवर फिरण्यास सांगितले. आठ ते दहा दिवस रेल्वे प्लॅटफॉर्मवर फिरण्यास सांगितल्यानंतर पुन्हा सुट्टीवर जाण्यास सांगितले व हेच काम पुन्हा करावे लागेल असे सांगितले. याबाबत शंका आल्याने तक्रारदार यांनी त्यांना जाब विचारला. कार्यालयीन क्लार्कचे काम असेल तर करु अन्यथा पैसे परत द्या, असे तक्रारदार यांनी बजावले. मात्र, संशयितांनी पैसे न देता त्यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तक्रारदार युवकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यातील आणखी काहीजणांची याप्रकरणी फसवणूक झाली असण्याची  शक्यता आहे. अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments