Header Ads

बालकुमार साहित्य संमेलनातून मुलांना समजले मोबाईलचे दुष्परिणाम satara

सातारा : मोबाईलच्या अतिवापराची आणि मुलांवर होणा-या दुष्परिणामाची चर्चा कायम होत असते मात्र तीच गोष्ट विनोदी कवितेच्या माध्यमातून हास्यसम्राट बंडा जोशी यांनी मुलांना सांगितल्याने ती अधिक परिणामकारकरित्या त्यांच्यापर्यंत पोहचली. निमित्त होत स्व. केशवरावजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त मसाप, शाहुपुरी शाखा व अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचं आणि संमेलनाध्यक्ष होते हास्यसम्राट बंडा जोशी. शाळेतील मुलांना साहित्याबाबत माहिती व्हावी, त्यांना प्रत्यक्ष लेखक, कवी, बालसहित्यकार यांची भेट व्हावी व त्यातून त्यांना वाचनाची, लेखनाची अधिक गोडी निर्माण व्हावी असा हेतू आहे. स्व. केशवराव पाटील ट्रस्टमार्फत दरवर्षी मसाप, शाहुपुरी शाखेच्या सहकार्याने बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी हत्तीखाना येथे अशाचप्रकारचे संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. एखादी गोष्ट सांगण्यापेक्षा ती चित्रातून अथवा कलाकृतीतून सांगितले तर ती पटकन लक्षात राहते. हाच धागा पकडून विनोद कवितेच्या माध्यमातून हास्यसम्राट बंडा जोशी यांनी मोबाईलचे मुलांवर होणारे दुष्परिणाम सांगितले आणि ते मुलांपर्यंत पोहचल्याने बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्देश सफल झाला.

यावेळी डॉ. राजेंद्र माने यांनी मुलांच्याबरोबर पालकांची जबाबदारी कशी आहे याबाबत मार्गदर्शन केले. मसाप जिल्हा प्रतिनिधी डॉ. रविंद्र बेडकिहाळ यांनी हे संमेलन आणखी मोठया प्रमाणात व्हावे असे सुचवले. संस्थेच्या चेअरमन डॉ. चेतना माजगावकर यांनी संमेलनाचे कौतुक करुन हे संमेलन आणखी दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही दिली. मुख्याध्यापिका उबाळे मॅडम यांनी कविता सादर केल्या. संमेलनाचे प्रास्ताविक मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती कुलकर्णी तर आभार अजित साळुंखे यांनी मानले. यावेळी नंदकुमार सावंत, वजीर नदाफ, संजय माने, सचिन सावंत, डॉ. उमेश करंबेळकर, अॅड. चंद्रकांत बेबले, अमर बेंद्रे, अजित कुलकर्णी, पालक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.  संमेलनापूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने सातारकरांचे लक्ष वेधून घेतले.

No comments