Header Ads

पतसंस्था नियामक मंडळाबाबत लवकरच शासनाची भूमिका स्पष्ट करु; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे पतसंस्थांचे फेडरेशनच्या अधिवेशनात आश्वासन satara

सातारा : महाराष्ट्रात सहकार चळवळ मोठया प्रमाणात रुजली त्यात पतसंस्था चळवळीचा मोठा वाटा आहे. या चळवळीसमोर सध्या अनेक प्रश्न आहेत. गेल्या काही दिवसांपासून नियामक मंडळाचा प्रश्न वारंवार चर्चेत येत आहे. महाविकास आघाडीच्या शासनाचा पतसंस्था चळवळ अविरत सुरु रहावी असाच दृष्टीकोन आहे. नियामक मंडळाबाबत असणारे प्रश्न, सूचना याबाबत लवकरच राज्यस्तरावर बैठक घेऊन त्यात शासनाची भूमिका स्पष्ट करु. या मंडळाबाबत काही बदल करणे आवश्यक असून त्यावेळी पतसंस्था फेडरेशनला विश्वासात घेऊ आणि फेडरेशनच्या शिष्टमंडळाला बैठकीला बोलावू असे आश्वासन सहकार, पणनमंत्री आणि सातारा जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. येथील शाहूकलामंदिरात सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित एकदिवसीय अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश (काका) पाटील, विनोद कुलकर्णी, नरेंद्र पाटील आणि संचालक मंडळ व मान्यवर उपस्थित होते.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, राज्याच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान मोलाचे आहे. सध्या या चळवळीपुढे जे प्रश्न आहेत त्याबाबत चर्चेने मार्ग काढता येईल. जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे काम चांगले आहे. नियामक मंडळाचा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहेत. या मंडळाच्या माध्यमातून सहकारामध्ये राजकारण येऊ नये अशी पतसंस्था फेडरेशन आणि पतसंस्थांची भूमिका आहे, ती योग्य असून याबाबत असलेल्या प्रश्न आणि सूचनांबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. काही बदल करणे आवश्यक असून त्यासाठी पतसंस्था फेडरेशनला विश्वासात घेऊ. स्पर्धेच्या काळात पतसंस्थांनी विस्तारापेक्षा विश्वासार्हता टिकवणे महत्वाचे आहे. आपल्या नियंत्रणात राहतील असेच कामकाज पतसंस्थांकडून अपेक्षित आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची महाविकास आघाडीचे जबाबदारी आहे. सहकारी संस्थांबाबत जागरुकता आली पाहिजे. ठेवींचा व्याजदर काय असावा याबाबत चर्चाविनिमिय होणे गरजेचे आहे. ठेवीदारांनीसुध्दा विश्वासार्ह ठिकाणी ठेवी ठेवल्या पाहिजेत. चांगले कर्जदार मिळण्यासाठी पतसंस्थांनी प्रयत्न करावेत. महाविकास आघाडी शासन चांगले काम करणा-यांच्या कायम पाठीशी असून त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण होणार नाही. नियामक मंडळ आणि पतसंस्थांच्या प्रश्नासंदर्भात होणा-या बैठकीस जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या शिष्टमंडळाला निमंत्रित करु असे आश्वासनही त्यांनी दिले.

जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी पतसंस्थांच्या कामकाजाची पध्दत उलगडून सांगितले. तसेच छोटया कर्जदारांवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली. यावेळी त्यांनी पतसंस्थांपुढे असणा-या नेमक्या अडचणी, संस्थाचालकांची मानसिकता आणि त्यावरील उपाययोजनांची मीमांसा केली. जगाची चिंता करण्यापेक्षा संस्थेचे कार्यक्षेत्र नियत्रंणात राहील एवढेच व्यवहार आणि पतसंस्था चळवळीचा मूळ उद्देशाप्रमाणे काम केल्यास खासगी सावकारीला चाप बसेल असेही स्पष्ट केले.

यावेळी बोलताना विनोद कुलकर्णी यांनी जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या कामाची पध्दत सांगत फेडरेशनच्या यशामध्ये संचालकांबरोबरच अधिकारी, कर्मचा-यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. फेडरेशनने विविध प्रश्नांची सोडवणूक कशी केली हे सांगत नियामक मंडळाला विरोध असण्याचे कारण सांगितले. नियामक मंडळापेक्षा अधिका-यांच्या अधिकारात वाढ करावी, ठेवींचा दर निश्चित करावा, तसेच बँकाप्रमाणे पतसंस्थांमधील ठेवींनाही विमा संरक्षण असले पाहिजे अशा विविध मागण्या असून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील त्याबाबत सकारात्मक विचार करुन निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविकात संचालक नरेंद्र पाटील यांनी पतसंस्था, सहकार चळवळीचा आढावा घेत फेडरेशनचा इतिहास सांगितला. त्यांनीही पतसंस्था आणि फेडरेशनसमोर असलेले प्रश्न आणि अडचणी मांडल्या. तसेच गेल्या पाच वर्षात सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले असून त्याची भरपाई या शासनाकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. अधिवेशनाची सुरुवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन झाली. त्यानंतर मान्यवरांचा संयोजकांकडून सत्कार करण्यात आला. पतसंस्था फेडरेशनच्या 'यशवंत सहकार' या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते फेडरेशनचे माजी चेअरमन गणपतराव साळुंखे, प्रभाकर साबळे, विनोद कुलकर्णी यांचा सत्कार तसेच पतसंस्था फेडरेशनचे अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी पुरस्कारप्राप्त धन्वतरी नागरी सहकारी पतसंस्था, सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था, चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था, नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था, गोपाळकृष्ण पंचक्रोशी पतसंस्था, शकुनी गणेश नागरी सहकारी पतसंस्था, नवलाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, पदमावती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, ब्रम्हचैतन्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, सातारा केमिस्ट नागरी सहकारी पतसंस्था, दत्त सहकारी पतसंस्था, दत्तात्रय कळंबे नागरी सहकारी पतसंस्थांना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सूत्रसंचालन शिरीष चिटणीस यांनी तर आभार राजेंद्र चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास सहाय्यक उपनिबंधक बाळासाहेब तावरे, सुनील जाधव, सौ. अंजली पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण क्षीरसागर, अविनाश कदम, धनश्री महाडिक, फेडरेशनचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, जिल्हयातील विविध पतसंस्थांचे संस्थापक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, अधिकारी आणि सेवक वर्ग, सातारा शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 

No comments