Header Ads

राजधानी साताऱ्यात शिवजयंती उत्साहात; शिवतीर्थ झाले शिवमय satara

सातारा : जिकडे पहावे तिकडे भगवे झेंडे, शिवतीर्थ सकाळपासूनच गजबजले, सायंकाळी शहरातून शाही मिरवणूका, चौकाचौकात उत्सव मंडळाचा उत्साह, सामाजिक उपक्रमांनीही काहींनी केली शिवजयंती साजरी, महिलांचा मोठा सहभाग हेच चित्र संपूर्ण शहरभर दिसत होते. शिवपराक्रमांचे लावले गेलेले पोवाडे, गडकोटांवरुन दौडत आणलेल्या मशाली, चौकाचौकात विविध मंडळांनी केलेल्या सजावटी, भगवा पताका लावून छत्रपती शिवप्रभूंच्या मूर्तीचे केलेले पूजन, अशा वातावरणाने अवघी राजधानीच सकाळपासूनच शिवमय होवून गेली होती. शिवतीर्थावर तर शिवभक्तांनी गर्दीचा महापूर लोटला होता. जय जय भवानी जय जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देत शिवतीर्थ दुमदूमून सोडला होता. काही उत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली. दिवसभर सातारा शहराचे वातावरण भगवे झाले होते. सायंकाळी उशीरा शिवजयंतीच्या भव्य अशा शाही मिरवणूका शहरातून काढण्यात आल्या. या मिरवणूका पाहण्यासाठी शहरातच्या दुतर्फा शहरवासियांनी गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची तयारी गेल्या एक महिन्यापासून काही सातारकर करत होते. त्यानुसार रात्री बारा वाजल्यापासून काहींनी तर काहींनी पहाटेपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला सुरुवात केली. गटकोटावरुन आणलेली ज्योत तेवत मंडळापुढे नेण्यापूर्वी शिवतीर्थावर अगोदर मंडळाचा कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला नतमस्तक होत होते. तेथून पुढे मंडळाच्या ठिकाणी जात होते. हिरकणी ग्रुपच्या महिलांनी सातारा शहरातुन सकाळी जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणा देत पारंपारिक वेशात मिरवणूक काढली. दिवसभर सगळे वातावरण शिवमय असेच झाले होते. प्रत्येक वाहनांवरही भगवे झेंडे दिसत होते. दुचाकीवर काहींनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवून फिरवत होते. सायंकाळी उशीरा सातारा शहरातून शाही मिरवणूकांना प्रारंभ झाला. पालिकेच्या जंगी मिरवणूकीमुळे वातावरणात उत्साह होता सातारा पालिकेच्यावतीने याही वषीं जंगी नियोजन करण्यात आले होते. सकाळीच पालिकेच्यावतीने शिवतीर्थावर नगराध्यक्षा माधवी कदम, यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments