Header Ads

मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करा; अन्यथा धरणाच्या भिंतीवर मुलाबाळांसह सत्याग्रह satara

सातारा : मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आठवडाभरात न केल्यास धरणग्रस्त मुलाबाळांसह धरणाच्या भिंतीवर सत्याग्रह सुरू करतील, असा इशारा जनजागर प्रतिष्ठानने दिला आहे. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना यासंदर्भातील निवेदन दिले आहे.

याबाबत प्रतिष्ठानचे मराठवाडी प्रकल्पातील मुख्य समन्वयक जितेंद्र पाटील म्हणाले, आधी पुनर्वसन, मगच धरण या कायद्याची येथे पायमल्ली सुरू आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्णत्वाकडे असताना अनेक प्रश्न तसेच लोंबकळत ठेवलेले आहेत. वारंवार निवेदन देवून आणि बैठका घेऊनही ठोस निर्णय होत नाहीत. घेतलेल्या निर्णयांचीही अंमलबजावणी केली जात नाही. सध्या करण्यात आलेल्या धरणाच्या वाढीव बांधकामामुळे येत्या पावसाळ्यात धरणग्रस्तांचे सर्वस्व पाण्याखाली जाणार आहे. आठवड्यात आमचे प्रलंबित प्रश्न मार्गी न लावल्यास धरणाच्या भिंतीवर मुलाबाळांसह सत्याग्रह सुरू करण्यात येईल. यासंदर्भातील निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. मेंढ येथील पुनर्वसित गावठाणातील 39 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी जमीन देण्याचा निर्णय संबंधित जमीन मालकांनी घेतल्याने त्यास मंजुरी देवून 39 कुटुंबांचा प्रश्न मार्गी लावावा. गेल्या पावसाळ्यात जमिनी पाण्याखाली गेलेल्या जिंती-सावंतवाडीतील 14 खातेदारांचा रोख रकमेचा प्रस्ताव मंजूर करावा. उमरकांचन येथील 18 खातेदारांना माहुली येथे लाभक्षेत्राबाहेरील जमिनी दिल्याने त्यांना कायद्यानुसार चारपट जमीन, कायमस्वरूपी निर्वाह भत्ता किंवा जमिनीऐवजी रोख रक्कम देवून न्याय द्यावा. उमरकांचन येथील 14 प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचे संपादन, संकलन दुरुस्ती आणि रोख रकमेच्या मागणीवर निर्णय घ्यावा. मूळ नुकसानभरपाईची शंभर टक्के रक्कम जमा असलेल्यांना पुनर्वसनाचा लाभ द्यावा. कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील लाभक्षेत्रांत दिलेल्या खडकाळ, नापीक जमिनी आणि न्यायालयाच्या निर्णयाने संपादनातून वगळलेल्या जमिनी याच्या बदल्यात संबंधित धरणग्रस्तांना रोख रक्कम द्यावी. धरणाच्या पाठीमागे शिल्लक राहिलेल्या जमिनी कसण्यासाठी रस्ता व सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. 

No comments