Header Ads

ब्रीज ऑफ होप केंद्राचे कार्य कौतुकास्पद; ब्रीज ऑफ होप केंद्रातर्फे मोफत ब्लँकेट वाटप satara

सातारा : सध्या शिक्षण क्षेत्रात क्लास संस्कृती आली आहे. मात्र, अनेक गरीब घरातील मुलांना असा खाजगी क्लास लावणे शक्य होत नाही. अशा मुलांवर चांगले संस्कार करण्याबरोबरच त्यांना मोफत शिक्षण, मोफत आहार देण्याचा ब्रीज ऑफ होप केंद्राचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून समाजाने अशा केंद्राच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार धनराज जगताप यांनी केले. सदरबझार परिसरातील जंरडेश्वर नाका येथे बिलिव्हर इस्टन चर्चच्या माध्यमातून गोरगरीब मुलांसाठी चालवण्यात येत असलेल्या ब्रीज ऑफ होप या चाईल्ड केअर प्रोजेक्ट केंद्रातील 82 मुलांना दानशुरांकडून आलेल्या ब्लँकेटसचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जगताप बोलत होते. यावेळी पत्रकार चंद्रकांत देवरुखकर, बिलिव्हर इस्टन चर्चचे फादर सतीश कमलाकर, व्यापारी प्रशांत बोराटे, राहूल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी धनराज जगताप पुढे म्हणाले, सध्या घराघरात टीव्ही, मोबाईल संस्कृती रुजली आहे. अगदी झोपडपट्टी याला अपवाद नाही. गरिबी, व्यसनाधिनता या गर्तेत अडकलेल्या घरातील मुलांवर चांगले संस्कार करण्याबरोबरच त्यांना मोफत शिक्षण, आहार देण्याचे चांगले काम या केंद्रात होत आहे. मुलांचे भविष्य चांगले घडवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात आम्ही निश्चितपणे सहभागी होवू. यावेळी मुंबईतील दानशुरांकडून आलेल्या 82 ब्लॅकेंटसचे वाटप मान्यवरांच्या हस्ते मुलांना करण्यात आले. केंद्राच्या को-ऑर्डिनेटर सोशल वर्कर ज्योती खांडेकर यांनी केंद्राच्या कामाच्या माहिती दिली. त्यांनी सांगितले की, देवाची आणि मानवतेची सेवा या अनुषंगाने ब्रीज आॐ होप हे चाईल्ड केअर प्रोजेक्ट चालविले जाते. या ठिकाणी मुलांना सहजरित्या शिक्षण मिळते. अनेक विद्यार्थी या केंद्राच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेण्यास जातात. या केंद्रात त्यांना शिक्षणाबरोबरच उत्कष्ट पद्धतीचे पौष्टिक आहार पण दिला जातो. त्यांच्या आरोग्याची तपासणी करुन त्यांना चांगले जगण्यासाठी प्रेरित केले जाते, यावेळी फादर सतीश कमलाकर यांनी या चांगल्या उपक्रमाला समाजातून पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. केंद्रातील शिक्षिका वनिता जावळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास केंद्रातील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच मुलांचे पालक, आहार सहाय्यक ज्योती भंडारे तसेच नागरिक उपस्थित होते.

No comments