Header Ads

उदयनराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत; गोर-गरिब जनतेच्या गरजांच्या पूर्ती करीता त्यांना मदत करण्याचे उदयनराजेंचे आवाहन satara

सातारा : अखिल विश्वाचे पोट भरणा-या बळीराजाच्या न थांबणा-या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि बेराजगारीने त्रासलेल्या युवा वर्गाची व्दिधा मनस्थिती या आणि अश्या अनेक बाबींचा विचार करुन, आम्ही आमचा दरवर्षी साजरा होत असलेला २४ फेब्रुवारी २०२० रोजीचा वाढदिवस, साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शुभेच्छा देखील स्विकारण्यास आम्ही सातारा मुक्कामी नसणार आहोत. त्यामुळे आमच्यावर जीवापाड प्रेम करणा-या तमाम व्यक्तींनी, आमच्या वाढदिवसाचा आग्रह धरु नये, असे आवाहन माजी खासदार व माजी मंत्री उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील एक वर्ष सरत असते. खरंतर आम्हास मुलतः वाढदिवस साजरा करण्याची तीव्र इच्छा नसते. परंतु आमच्यावर प्रेम करणा-या लाखो-करोडो मनांचा उत्साह पाहील्यावर तमाम व्यक्तींच्या मनाचा आदर ठेवण्याकरीता यापूर्वी एक-दोन वर्षे सोडून, अनेक वेळा साजरा केलेला आहे. अश्यावेळी, आम्ही, आमच्या वाढदिनाचे औचित्य साधुन जनसेवेच्या कामांचा शुभारंभ अथवा जनसेवेच्या कार्याची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तथापि अलीकडच्या काळात, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या आत्महत्या काही केल्या थांबलेल्या नाहीत. तसेच सध्याची राजकीय अस्थिर परिस्थिती पहाता, आमचा वाढदिवस साजरा करणे आम्हास उचित वाटत नाही.सबब, आमचा वाढदिवस कोणीही कोणत्याही पध्दतीने साजरा करु नये, त्यापेक्षा गोर-गरिब जनतेच्या आवश्यक गरजांच्या पूर्ती करीता परस्पर त्यांना मदत करावी अशी आमची आंतरिक तळमळ आम्ही व्यक्त करीत आहोत असेही उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.

No comments