Header Ads

राज्यातील पहिल्या मराठी भाषा पंधरवडयांच्या आठव्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम; मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने आयोजन satara

सातारा : कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची जयंती आणि कवी विंदा करंदीकर यांच्या स्मृतीदिनाचा योग साधून मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने महाराष्ट्रातील पहिल्या मराठी भाषा पंधरवडयांची सुरुवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे सलग आठव्या वर्षी 27 फेब्रुवारी ते 15 मार्च 2020 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. मराठी भाषा पंधरवडयाचे उद्घाटन 27 फेब्रुवारी रोजी नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सायंकाळी 6.30 वाजता प्रसिध्द लेखक व प्रकाशक रामदास भटकळ यांच्याहस्ते होणार असून मसाप, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, नगरसेवक अविनाश कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पंधरवडयातील दुसरा कार्यक्रम रविवार 1  मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने विशेष व्याख्यान होणार आहे. मसाप पुणेचे शहर प्रतिनिधी वि.दा.पिंगळे यांचे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जीवन व साहित्य या विषयावर व्याख्यान होणार असून यावेळी मसाप पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस आणि अश्वमेध नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन रविंद्र झुटींग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शनिवार 7 मार्च रोजी पंधरवडयातील तिसरा कार्यक्रम होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. सदानंद मोरे यांची टिळक-गांधी आणि महाराष्ट्र या विषयावर मुलाखत जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ घेणार आहेत. यावेळी मसाप, पुणेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.मराठी भाषा पंधरवडयाचा समारोप 15 मार्च रोजी शाहू कलामंदिर येथे युवा साहित्य नाटय संमेलनाने मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडयाच्या सर्व कार्यक्रमास साता-यातील साहित्यप्रेमी आणि रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मसाप, शाहुपुरी शाखेचे उपाध्यक्ष अजित साळुंखे,  कार्यवाह नंदकुमार सावंत, अॅड. चंद्रकांत बेबले, डॉ. उमेश करंबेळकर आणि पदाधिका-यांनी केले आहे.

No comments