Header Ads

साताऱ्यात हॉकर्स संघटनेचे आंदोलन; अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न satara

सातारा : पोलिसांच्या वाहतूक शाखेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेला विरोध दर्शवत हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्या. शहरातील अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या अतिक्रमणांविरोधात सातारा पालिकेने सोमवारपासून कारवाई मोहीम हाती घेतली आहे. एकीकडे पालिका तर दुसरीकडे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडूनही सोमवारी बसस्थानकासमोरील अतिक्रमणे हटविण्यात आली. येथील फूटपाथवर अनेक विक्रेत्यांनी बांबूचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. विक्रेत्यांचा विरोध झुगारून पोलिसांनी फुटपाथ व रस्त्यावरील अतिक्रमणे काढली.

दरम्यान, पोलीस प्रशासन न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंखन करीत असल्याचा आरोप सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटनेच्या वतीने करण्यात आला. ही मोहीम तातडीने थांबविण्यात यावी, यासाठी गुरुवारी सकाळी पावणे अकरा वाजता हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम, सातारा शहर अध्यक्ष संजय पवार, सागर भोगावकर, विनोद मोरे, पिरमोहम्मद बागवान,  राजेंद्र तपासे, प्रशांत धुमाळ, फिरोज पटवेकर, यांच्यासह सुमारे तीनशे ते चारशे हातगाडीधारक बसस्थानकासमोर एकत्र आले. यानंतर संजय पवार व लक्ष्मण निकम यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या आंदोलनामुळे बसस्थानक मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

No comments