Header Ads

मराठी भाषा गौरव दिन समारंभ रयतमध्ये संपन्न; मातृभाषेत शिकलेल्या मुलांमध्ये ज्ञानग्रहण व आकलनक्षमता वाढते : जिल्हाधिकारी शेखर सिंह satara

सातारा : भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण २२ भाषा बोलल्या जातात. ज्या मुलांचे मातृभाषेत शिक्षण झाले आहे अशा मुलांमध्ये ज्ञानग्रहण करण्याची आणि आकलनाची क्षमताही वाढते हे आता सिद्ध झाले आहे. ज्या मुलांचे शिक्षण मातृभाषेत झालेले आहे, अशी अनेक मुले आज चांगल्या पदांवर काम करीत आहे, पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतच शिक्षण देण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केले. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा मराठी विभाग व   जिल्हा माहिती कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन सप्ताह व मराठी भाषा गौरव दिन निमिताने  महाविद्यालयाच्या सभागृहात मराठी भाषिक कौशल्य विकास या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी शेखर‍ सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अनिसा मुजावर, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे प्रा.डॉ .कांचन नलावडे, डॉ.मानसी लाटकर आदी उपस्थित होते.

भारतात 22 भाषा बोलल्या जातात त्यापैकी मराठी भाषा खूप जुनी आणि महत्वाची भाषा असून या भाषेला मोठा इतिहास  आहे, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, आज विविध भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, मातृभाषेचे जतन व संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. मातृभाषेमध्ये मोठी ताकद असून पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे, असे सांगून त्यांनी मातृभाषा दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. आपल्या मातृभाषेला खूप जुना इतिहास आहे, त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मातृभाषेत शिक्षण घेतल्यास विचारांची खोली वाढते. मातृभाषेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदांवर काम करीत आहे. संगणकांचे सॉफ्टवेअर आज मराठीतही उपलब्ध होत आहेत. मराठी भाषेला एक संस्कृती आहे त्याचे संशोधन होणे गरजेचे आहे. मराठी भाषा आपल्या सर्वांचा  अभिमानाचा मानबिंदू असून तीचे   वैभव प्रत्येकाने जपले पाहिजे, असे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यावेळी सांगितले. जसे आपण आपल्या आईवर प्रेम करतो तसे आपल्या मातृभाषेवर प्रेम केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये संस्कृत आणि प्राकृत भाषेमध्ये अभ्यास केला जातो. भविष्यकाळात ब्राम्ही लिपीचा कोर्स घेणार असून हे महाविद्यालय मराठी भाषेच्या संवर्धनाचे काम चांगल्या पद्धतीने करत असल्याचे महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. अनिसा मुजावर यांनी सांगितले. मुख्य कार्यक्रमानंतर महाविद्यलयातील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनही जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भाषिक कौशल्य विकास या राष्ट्रीय कार्यशाळेस बी.व्होक चे प्रमुख प्रा.संपतराव पिंपळे, प्रा.शैलेश थोरात, प्रा.डॉ सादिक तांबोळी, प्रा.डॉ .संजयकुमार सरगडे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी दिनानिमित्त महाविद्यालयाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे. मराठी गीत गायन स्पर्धा- अमोल बल्लाळ प्रथम, अंजली गायकवाड व अदिती चिवटे द्वितीय, रांगोळी स्पर्धा- प्रीती पाटील व कोमल शिंदे प्रथम क्रमांक, ऋतुजा पाटील व सोनाली राजे द्वितीय, पोस्टर स्पर्धा- श्वेता शेडगे व आरजू इनामदार प्रथम, वर्षाराणी बागल द्वितीय, हुमणे स्पर्धा- अमृता नलावडे प्रथम, कोमल मस्के द्वितीय, निबंध स्पर्धा- कोमल मस्के प्रथम, प्रमिला चव्हाण द्वितीय, घोषवाक्य निर्मिती स्पर्धा- ईशा गायकवाड प्रथम, काजल जाधव द्वितीय, चित्रकला स्पर्धा- कोमल मस्के प्रथम, प्रियांका मगरे द्वितीय, म्हणी संकलन स्पर्धा- कोमल मस्के प्रथम, सोनाली राजे द्वितीय. या विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

No comments