Header Ads

मुलांना अश्‍लिल चित्रफित दाखविल्याने केंब्रिज हायस्कूलचे कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात satara

पाचगणी : पाचगणी ता. महाबळेश्वर येथील केंब्रिज हायस्कूलमधून पळून जाताना सापडलेल्या ११ मुलांना अश्‍लिल चित्रफित दाखवण्याबरोबरच वेळोवेळी मारहाण करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्‍सो) गुन्हा दाखल झाला. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी हायस्कूलमध्ये होत असलेल्या अत्याचार आणि मारहाणीला कंटाळून १४ विद्यार्थी पळून जात होते. भोसेच्या युवकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर या मुलांनी आम्हाला शाळेत पुन्हा मारहाण होईल. आम्हाला सरकारच्या ताब्यात द्या, अशी विनवणी केल्याने त्यांना साताऱ्याच्या बाल संरक्षण विभागाकडे निरीक्षणगृहात वर्ग केले. त्या ठिकाणी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मनीषा बर्गे यांच्यासह अन्य सदस्यांनी या मुलांची चौकशी केली असता हायस्कूलमध्ये होणारे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. या समितीने दिलेल्या पत्रात मुलांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थांना अश्‍लिल चित्रफित दाखवण्याबरोबरच वेळोवेळी मारहाण केल्याप्रकरणी केंब्रिज हायस्कूलमधील सूरज भिलारे रा. सोमर्डी, ता.जावळी व स्वप्नील कदम रा.कळमगाव, ता. महाबळेश्वर यांच्यावर पाचगणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पालक तानाजी शांताराम साबळे, रा. निमगिरी, ता. जुन्नर, जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे. ११ पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी सातारा पोलिस ठाण्यात केंब्रिज हायस्कूलच्या शालेय कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो आज पाचगणी पोलिस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक अजित टिके तपास करत आहेत.

No comments