Header Ads

साताऱ्यात जलसाक्षरता कार्यशाळा संपन्न satara

सातारा : उपलब्ध पाण्याच्या कमतरेमुळे मागील वर्षी आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागला. दुष्काळी भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्या लागल्या. तसेच ज्या भागात जास्त पाणी अशा भागात अनेक वर्षांपासून ऊस पिक घेत आहेत, यामुळे तेथील जमीनी आता क्षारपड होत असून दुष्काळी भागाबरोबरच ज्या भागत पाणी जास्त आहे अशा भागांमध्ये पाण्याच्या वापराबाबत जनजागृती केली पाहिजे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आज केले. जलसाक्षरता केंद्र यशदा पुणे यांच्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज एकदिवसीय विभागीय जलसाक्षरता कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आलेले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता बापुसाहेब पवार, यशदाचे जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, कार्यकारी अभियंता अशोक पवार, जलसाक्षरता केंद्राचे संचालक डॉ. सुमंत पांडे आदी उपस्थित होते.

पाण्याला किती महत्व आहे याची जनजागृतीकरण्यासाठी जलदुतांनी ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहचून जनजागृती केली पाहिजे, असे सांगून अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे पुढे म्हणाले, राळेगणसिद्धी व हिवरेबाजार या दोन्ही गावांनी गावाला लागणाऱ्या पाण्याचा ताळेबंद करुन उपलब्ध पाण्याचे नियोजन करुन योग्यती पिके घेतली. पाण्याच्या योग्य वापरामुळेच या गावांनी आपला विकास केला आहे. या गावांचा आदर्श घेऊन सातारा जिल्ह्यातही अशी गावे निर्माण होण्यासाठी ग्रामीण पातळीवर पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी सर्व विभागांबरोबर जलदुतांनी प्रयत्न करावे. भविष्यात दुष्काळी तालुक्यांबरोबरच ज्या तालुक्यात पाणी जास्त आहे अशा तालुक्यांमध्येही जलसाक्षरतेबाबत कार्यशाळा घेण्यात यावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी यावेळी केले. पाणी वाटपाची जबाबदारी ही शासनाने स्वत:कडे ठेवली आहे.  पाणी नैसर्गिंक संपत्ती असून पाण्याचे महत्व सगळ्यांना पटवून देण्याची गरज आज भासली आहे. जीवनसृष्टी जीवंत ठेवण्याबरोबर समद्ध करण्याचीही ताकद पाण्यामध्ये आहे. जास्त करुन पाणी हे कृषी, पिण्यासाठी व उद्योगांसाठी वापरले जाते. उपलब्ध पाण्याची मर्यादा पाहता कृषी क्षेत्र हे ठिबक सिंचनाखाली आणले पाहिजे. पाणी वापराबाबत अत्याधुनिक पद्धत वापरली पाहिजे, असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बापुसाहेब पवार यांनी कार्यशाळेत सांगितले.

पाण्याची उपलब्धता पाहता पाण्याचे महत्व आणि  वापराबाबत शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागात जनजागृती व्हावी यासाठी आत्तपर्यंत 5 जिल्ह्यात कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. यापुढे संपूर्ण महाराष्ट्र अशा प्रकारच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. जलदुत हे जिल्हास्तरावर, तालुकास्तराबरोबर ग्रामीण भागात जलसाक्षरतेचे काम करणार असून पाण्याच्या संबंधित काम करणाऱ्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी जलसाक्षरतेसाठी पुढकार घ्यावा घ्यावा, असे आवाहन यशदा येथील जलसाक्षरता केंद्राचे  संचालक आनंद पुसावळे यांनी केले. या कार्यक्रामाचे प्रास्ताविक डॉ. सुमंत पांडे यांनी केले तर आभार उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी मानले. या कार्यशाळेस विविध विभागांचे अधिकारी, जलदुत, जलप्रेमी, जलनायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments