Header Ads

रमाई घरकुल योजनेतील २५० लाभार्थीना मंजूरी पत्राचे वाटप; पाटण पंचायत समितीचे सर्वच उपक्रम लोकाभिमुख : सत्यजितसिंह पाटणकर patan

पाटण : पाटण पंचायत समितीची सत्ता ज्या ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाकडे असते त्या त्या वेळी समाजहिताचे अनेक उपक्रम येथे राबविले जातात. स्थानिक जनतेने ही एकहाती सत्ता दिल्याने येथे गेल्या तीन वर्षांत अनेक समाजाभिमुख उपक्रम पार पडले आणि यातूनच स्थानिकांना न्याय मिळाला. रमाई घरकुल योजनेतून एकाच वेळी तब्बल २५० लाभार्थीना लाभ देणार्‍या या पंचायत समिती सभापती, उपसभापती व प्रशासनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. येणाऱ्या काळातही याहीपेक्षा अधिक गतीने असे विकासात्मक उपक्रम राबविण्यात यावेत त्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिली. पाटण पंचायत समितीच्या वतीने सन १९/२० सालातील रमाई घरकुल योजनेतंर्गत २५० लाभार्थीना घरकूल मंजूरी पत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सदस्य बबनराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, राजकीय सत्ता येतात व जातात पण ज्या विश्वासाने जनता आपल्या ताब्यात सत्ता देते तो विश्वास टिकवून त्याला पात्र रहाणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे नैतिक कर्तव्य असले पाहिजे. आजवर पंचायत समितीची सत्ता ही अनेकदा दोलायमान स्थितीत असल्याने सामाजिक कार्य करताना राजकीय अडचणी निर्माण व्हायच्या परंतु आपल्या हातात जनतेने एक हाती सत्ता दिल्यामुळे पंचायत समितीची सुसज्ज इमारत उभी राहिली, एकहाती सत्ता असल्याने असे लोकाभिमुख उपक्रम येथे राबविण्यात यश मिळाले आहे. राजाभाऊ शेलार म्हणाले आमचे नेते विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांनी आम्हाला विचारांचा वारसा दिला आहे. निवडणूकीपुरते राजकारण आणि कायम समाजकारण ही शिकवण असल्याने मग कोणत्याही कार्यक्रमात राजकीय गट, तट न पहाता सर्वसामान्य माणूस आणि त्याच्यापर्यंत अधिकाधिक विकास पोहोचविणे एवढेच कर्तव्य मानून येथे आम्ही काम करतो आणि त्यात यशस्वी ठरतो याचाही आम्हाला अभिमान आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थीना यमाई घरकुल योजनेचे मंजुरी पत्र देण्यात आले. स्वागत उपसभापती प्रतापराव देसाई यांनी व आभार प्रदर्शन बबनराव कांबळे यांनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकारी, लाभार्थी उपस्थित होते.

No comments